लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार अर्थखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडे सोपवण्यात आल्याने यापुढे मेट्रोचा कारभार मुंबईतूनच चालणार की पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेट्रो टप्पा-१ च्या भूमिपूजनापासून तर प्रकल्प पूर्ण करण्यापर्यंत महामेट्रोची धुरा सांभाळणारे डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांच्या पदाचा कार्यभार नितीन करीर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दीक्षित यांच्या कार्यकाळात नागपूरसह राज्यातील पुणे, नाशिक व अन्य मेट्रो प्रकल्पाचे काम नागपुरातूनच चालत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने ते नागपुरात आल्यावर नियमित या प्रकल्पाचा आढावा घेत होते. या शिवाय मेट्रोने नागपूर सुधार प्रन्यास आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचीही काही कामे हाती घेतली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामही महामेट्रोला सोपवण्यात आले आहे. शिवाय मेट्रो टप्पा-२ लाही मंजुरी मिळाली आहे. महामेट्रोकडील कामांचा व्याप लक्षात घेता येथे पूर्णवेळ अधिकाऱ्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

हेही वाचा… वाशीम : बापचं निघाला वैरी! लेकीचे तुकडे करून खताच्या पोत्यात भरून फेकून दिले…

करीर यांच्याकडे अर्थखात्यासारखा महत्त्वाच्या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी मुंबईतूनच ते महामेट्रोचे कामकाज सांभाळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते आहे आणि ते नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळे फडणवीस आणि करीर मंत्रालयातून महामेट्रोकडे लक्ष देऊ शकतात, असा दावा करणारा एक मतप्रवाह आहे. मात्र करीर यांची कार्यव्यस्तता लक्षात घेता ते महामेट्रोला किती वेळ देऊ शकतील, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाकडून पूर्णवेळ अधिकारी नियुक्त केला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा… नागपूर: ‘वंदे भारत’च्या प्रवाशांना ‘कार-टू-कोच प्रिमियम’ सुविधा

मेट्रो टप्पा-२ ला लवकरच सुरुवात?

मेट्रो टप्पा-२ साठी जमिनीच्या चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, महामेट्रोकडून याला दुजोरा देण्यात आला आहे. एकूण ४३.८ किमी.चा हा टप्पा असून त्यामाध्यमातून मेट्रो शहरालगतच्या गावांना जोडली जाणार आहे. उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगण्यापर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. या टप्प्यामुळे एकूण ३० स्थानके उभारली जाणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sources of nagpur metro will shifted from mumbai ceb 76 dvr
First published on: 24-05-2023 at 11:30 IST