अमरावती : दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागातील भिकनूर-तळमडला सेक्शनमध्ये रेल्वे मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे दुसऱ्या दिवशीही रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

शनिवार ३० ऑगस्ट रोजी काचिगुडा रेल्वेस्थानकावरून सकाळी ७.१० वाजता सुटणारी क्रमांक १७६४१ काचिगुडा- नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेस ही पाऊण तास उशिरा म्हणजे ७.५६ वाजता सुटली. ही गाडी आपला नियमित मार्ग बदलून विकाराबाद-परळी-पूर्णा अशी धावत आहे. त्यामुळे या गाडीचे काचिगुडा ते पूर्णा दरम्यान सर्व थांबे वगळण्यात आले आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

२९ ऑगस्टला साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरून रवाना झालेली क्रमांक १८५०४ साईनगर शिर्डी-विशाखापट्टनम एक्स्प्रेस ही तब्बल सहा तास विलंबाने धावत असून ही एक्स्प्रेस परभणी-परळी-विकाराबाद-सिकंदराबाद-चार्लापल्ली या मार्गावरून वळवण्यात आली आहे. परभणी ते चार्लापल्ली दरम्यानचे सर्व थांबे वगळण्यात आले आहेत.

२९ ऑगस्टला काचिगुडा येथून रात्री ११.५० वाजता सुटणारी क्रमांक १७६०५ काचिगुडा-भगत की कोठी एक्स्प्रेस सात तास उशिरा म्हणजे ३० ऑगस्टला सकाळी ७ वाजता सुटली. ही एक्स्प्रेस बल्लारशा-माजरी-वर्धा-अकोला या बदललेल्या मार्गावरून धावत आहे. या एक्स्प्रेसचे निझामाबाद ते अकोला दरम्यान सर्व थांबे वगळण्यात आले आहेत. ही एक्‍स्‍प्रेस सात तास विलंबाने धावत आहे.

पावसाचा फटका अनेक रेल्‍वेगाड्यांना बसला असून अनेक रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. ३१ ऑगस्टला सुटणारी ७७६१५ परळी वैजनाथ-आदिलाबाद एक्स्प्रेस, ७७६१६ आदिलाबाद-पूर्णा एक्स्प्रेस, ०७२८१ पूर्णा-जालना डेमू, १ सप्टेंबरला सुटणारी ७७६१९ जालना-नागरसोल, ७७६२० नागरसोल-जालना एक्स्प्रेस, ०७२८२ जालना-नांदेड या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

२ सप्टेंबरला सुटणारी नांदेड-मेडचल एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. २९ ऑगस्टला सुटणारी १७६८४ पूर्णा-अकोला आणि ३० ऑगस्टला सुटणारी १७६८३ अकोला-पूर्णा एक्स्प्रेस धावणार नाही.

३० ऑगस्टला अकोला ते अकोट दरम्यान धावणाऱ्या सहा डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ३० ऑगस्टची मनमाड-काचिगुडा अजंता एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. वाहतूक बदलाचा फटका प्रवाशांना बसला आहे. अनेक रेल्‍वेगाड्यांचे मार्ग बदलण्‍यात आल्‍याने अनेक प्रवासी रेल्‍वेस्‍थानकांवरच अडकून पडले आहेत. त्‍यांना ऐनवेळी वाहतुकीच्‍या पर्यायी साधनांचा शोध घ्‍यावा लागत आहे. आगाऊ आरक्षण करूनही प्रवाशांना कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत.