वाशीम : पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु पाऊस होईल, या आशेवर जिल्हयातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. जिल्हयातील ४ लाख ५ हजार ३६० हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १ लाख १७ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. परंतु पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत असून वेळेवर पाऊस न झाल्यास २८ टक्के क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट गडद होत चालले आहे.
गत वर्षी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जुलै महिन्यापर्यत पीके बहरली होती. मात्र, यावर्षी मृग नक्षत्रात काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. परंतु पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. जवळपास १ लाख १७ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. पेरण्यानंतर जिल्हयात दमदार पाऊसच झाला नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा >>>गोंदिया: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा फलकांवर शरद पवारांचा फोटो; चर्चांना उधाण…
वाशीम तालुक्यात २५ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर, रिसोड तालुक्यात ३७५ हेक्टर क्षेत्र, मालेगाव तालुक्यात १७ हजार हेक्टर क्षेत्र, मंगरुळपीर तालुक्यात २७ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर, मानोरा तालुक्यात १४ हजार ९९४ हेक्टर क्षेत्र आणि कारंजा तालुक्यत ३२ हजार ८१७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहेत त्यांच्याकडून पीके जगविण्यासाठी सिंचनाचा वापर होत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची कुठलीच व्यवस्था नाही. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.जिल्ह्यात २८ टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. पावसाचा विचार करता कमी कालावधीत उगवणाऱ्या वाणांचा शेतकऱ्यांनी वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शाह यांनी केले आहे.