पंतप्रधानांचा संकुलातील कार्यक्रम महागात पडला; पाहणी अहवाल शासनाला देणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमामुळे तेथील ‘वुडन कोर्ट’ आणि ‘अ‍ॅकेस्टिक’सह इतरही प्रमुख साहित्यांचे सुमारे चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

नीती आयोगातर्फे आयोजित डिजीधन मेळावा १४ एप्रिलला क्रीडा संकुलात पार पडला. मोदींसाठी १०० फुटांचे डिजिटल व्यासपीठ, चार मोठे स्क्रीन स्टेडियमच्या आत लावण्यात आले होते. कार्यक्रमाची जबाबदारी नवी दिल्ली येथील ‘विझक्राफ्ट इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीला देण्यात आली होती.

जवळपास ३०० हून अधिक शासकीय आणि खासगी कर्मचारी तयारीच्या कामात व्यस्त होते. संकुलातील इंडोअर स्टेडियमवर कार्यक्रम असल्याने तेथील ‘वुडन कोर्ट’चा वापर करण्यात आला. त्यावर वजनी लोखंडी पेटय़ा ठेवण्यात आल्या. स्क्रीनसाठी लोखंडी खांब, ट्रॉलीचा वापर वुडन कोर्टावर करण्यात आला. स्टेडियमच्या भिंतीवर असलेल्या ‘अ‍ॅकोस्टिक’ वर मोठे खांब लावून तेथे एलईडी स्क्रीन लावण्यात आले. यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वुडन कोर्टची वाताहत झाली. कार्यक्रमानंतरही असेच चित्र बघायला मिळाले. सर्व वजनी साहित्य वुडन कोर्टवर ठेवण्यात आले. स्क्रीनसाठी लावलेले लोखंडी खांबही कोर्टावर आदळण्यात आले. त्यादरम्यान भिंतीवरील ‘अ‍ॅकोस्टिक’ सहित्य तुटले. काचा फुटल्या.

सीसीटीव्ही कॅमेर गायब झाले. लोखंडी वस्तू वाहून नेल्याने कोर्टचा लाकडी भाग उखडल्या गेला.

कार्यक्रमानंतर क्रीडा संकुल आणि वुडन कोर्टची किती हानी झाली, याबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश क्रीडा संकुल समितीला देण्यात आले. त्याप्रमाणे समितीने अहवाल तयार केला असून सुमारे ४० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्या कंपनीने वुडन कोर्टचे काम केले त्या शशी प्रभू कंपनीने सादर केलेल्या अहवालानुसार १ हजार ७५० चौरस मीटरचा भाग आणि ९० चौरस मीटर बाहेरचा भाग नुकसानग्रस्त झाला आहे. यामुळे एकूण ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले. पिंगळे कंपनीने अ‍ॅकोस्टिक साहित्याचे २ लाख ६० हजार रुपयाचा नुकसान झाल्याचा अहवाल दिला. हा अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. त्यानंतर किती महिन्यात हे काम पूर्ण होईल, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.