यवतमाळ : कोणाचा राग कशाने अनावर होईल हे सांगताच येत नाही. एका लग्नाच्या पंगतीत वाढप्यांना त्रास देणाऱ्या वऱ्हाड्यास जबरदस्तीने उठवले म्हणून त्याने चाकूहल्ला करून एकास जखमी केले. राहुल नंदकिशोर केसलकर, असे जखमीचे नाव आहे. ही घटना यवतमाळ तालुक्यातील बोरीसिंह येथे घडली.

बोरीसिंह येथील दिशेन बहिरम यांच्याकडे भाचीचे लग्न होते. या लग्नासाठी यवतमाळचे वऱ्हाडी आले होते. त्यांच्यासाठी बहिरम यांनी पंगतीचे जेवण ठेवले. गावातील युवक पंगतीत वाढण्याचे काम करीत होते. तीन पंगती उठल्यातरी एक तरूण जागेवर बसून इतरांना त्रास देत होता. वाढणाऱ्यांनी त्याला समजावून सांगितले. मात्र, त्याने ऐकले नाही. त्यामुळे त्याला जबरदस्तीने पंगतीतून उठवून बाहेर नेण्यात आले. त्यामुळे तो युवक संतापला.

हेही वाचा >>> विमान हवेत उडताच पक्षी धडकला; तातडीने माघारी फिरल्याने मोठी दुर्घटना टळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या एका भावास मंडपात बोलावून घेतले आणि ‘हाच पंगतीतून उठवणारा’ म्हणत राहुल केसलकर या तरूणावर थेट चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने राहुलच्या पाठीत चाकू भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला. या झटापटीत गावकऱ्यांनी एका हल्लेखोरास पकडून बेदम चोप दिला व वडगाव जंगल पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी दिनेश बहिरम यांच्या तक्रारीवरून प्रणय कैलास चेलपेलवार (२२, रा. अंबिकानगर, यवतमाळ) याच्यासह दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.