भंडारा: राज्य शासनाच्या आदेशानुसार आज दिनांक १९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व यू-डायस क्रमांक असलेल्या शाळांचे जीआयएस मॅपिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते. शिक्षण आयुक्तांच्या १७ एप्रिल रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत यासंदर्भात सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिवशी म्हणजेच आज, राज्यातील अनेक शाळांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले.

जीआयएस मॅपिंगसाठी आवश्यक असलेले महा स्कूल जीआयएस १.० हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्यासाठी एपीके फाईल राज्यस्तरावरून वितरित करण्यात आली होती. परंतु काही शाळांना ती वेळेत मिळाली नाही, तर काही शाळांमध्ये ॲप डाउनलोड करताना ‘प्ले प्रोजेक्ट’ सेटिंगमुळे अडचणी आल्या. अनेक शाळांमध्ये ॲप लॉगिन होत नव्हते किंवा नेटवर्कची समस्या भेडसावत होती. ओटीपी वेळेवर न मिळणे, ऍप हँग होणे, फोटो अपलोड न होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे शाळांचे जीआयएस मॅपिंग अपूर्ण राहिले.

प्रत्येक शाळेने फ्रंट व्ह्यू, जनरल व्ह्यू, किचन शेड, पिण्याचे पाणी, मुला-मुलींचे शौचालय अशा विविध सुविधांचे फोटो ‘जिओ टॅग’ करून अपलोड करणे बंधनकारक होते. मात्र अनेक मुख्याध्यापकांनी यामध्ये तांत्रिक समस्यांमुळे वेळ वाया गेला, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाने जीआयएस मॅपिंगसाठी केवळ एकच दिवस ठेवला असल्याने तणाव वाढला असून, वेळ वाढवून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून या समस्यांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.