भंडारा : भटक्या कुत्र्यांचा हल्ला हा विषय सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या दररोज येत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गाजत असताना भंडारा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. समवयस्क मित्रांसोबत खेळत असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्यावर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला, यात हा चिमुकला गंभीरित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे.

शहरात कुत्र्यांचा उच्छाद वाढतच असून पुन्हा एका पाच वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत गंभीर रित्या जखमी केल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसारा येथे ही घटना घडली. शाळेला सुट्टी असल्याने पाच वर्षाचा चिमुकला त्याच्या मित्रांसोबत घराच्या जवळील परिसरात खेळत होता. या परिसरात कोंढा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळच एक खेळाचे मैदान आहे ज्या मैदानात दररोज मुले खेळण्यासाठी येतात. नेहमीप्रमाणे मुले खेळण्यात मग्न असतानाच अचानक १५ ते २० कुत्र्यांची टोळी तेथे आली आणि मुलांकडे बघून भुंकू लागली. एकाच वेळी एवढे कुत्रे बघून मुले घाबरली आणि पळू लागली त्यातच ५ वर्षीय शर्वील कुत्र्यांच्या तावडीत सापडला. कुत्र्यांच्या टोळक्यातील एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला रक्त बंबाळ केले. कुत्र्याने शर्वीच्या नाकाला जोरदार चावा घेतल्याने त्याचे नाक अक्षरशः कापले गेले. नाकापासून जबड्यापर्यंत तसेच चेहऱ्यावर शर्विला अनेक जखमा झाल्या.

गंभीर रित्या जखमी झालेल्या शर्विलला प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे प्राथमिक उपचार करून भंडारा येथील खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती अत्त्यवस्थ झाल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शर्विल स्वप्निल लोणारे हा पवनी तालुक्यात कोसरा येथील आंबेडकर वॉर्ड येथे राहतो. त्याचे आई-वडील दोघेही मजुरीच्या कामावर जातात. शर्विल आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्यावर झालेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे त्याचे आई-वडील धास्तावलेले आहे. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत खेळत असताना त्याच्यावर हा प्रसंग ओढावला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.