आतापर्यंत ७६२ टन सुपारी जप्त

नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डी आरआय) इंडोनेशियातून नागपुरात आयात करण्यात येणाऱ्या सडकी सुपारीच्या व्यापाराविरुद्ध कारवाई अधिकच तीव्र केली असून आतापर्यंत ७६२ मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली आहे. अनेक प्रतिष्ठानांविरुद्ध खटले भरण्यात आले आहेत.

इंडोनेशियामध्ये मोठय़ा प्रमाणात सुपारीचे उत्पन्न घेण्यात येत असून त्या सुपारीचा दर्जा भारतातील सुपारीपेक्षा निकृष्ट असतो. विदेशातून सुपारीची आयात करण्यासाठी १०८ टक्के सीमाशुल्क आकारला जातो. हे शुल्क वाचवण्यासाठी नागपुरातील अनेक व्यापारी म्यानमारच्या सीमेवरून या सुपारीची तस्करी करतात. या तस्करीविरुद्ध डीआरआयने कारवाईची मोहीम हाती घेतली. १० सप्टेंबर २०१७ ला देशात प्रथमच डीआरआयने सडकी सुपारीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमध्ये मेसर्स एस. ए. इंटरप्रायजेसच्या भंडारा मार्गावरील उमरी फाटा येथील गोदामावर छापा टाकून १०७ टन सुपारी पकडली. त्या प्रकरणी कंपनीचे संचालक सय्यद अहमद शेख याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर फारुख नुसारी, दीपक साधवानी आणि वसरून साधवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरुनला चेन्नई विमानतळावरून अटक झाली होती. त्यानंतर मोहम्मद राजा अब्दुल गणी तंवर याच्यावर १७ सप्टेंबर २०१७ ला कारवाई करून २३० टन सुपारी जप्त करण्यात आली व त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील कंपनी मेसर्स सिल्वर एक्सपोर्ट या कंपनीवर नागपूरच्या डीआरआयने कारवाई करून श्रीलंका मार्गे तस्करी करण्यात आलेली १४८ टन सुपारी पकडली होती. २७ मे २०१९ ला डीआरआयने मनोज देविचंद कोठारी, विपीन प्रवीण पांडे यांची २७७ टन सुपारी जप्त केली.

त्यानंतर आसीफ कलीवाला, वसीम बावला यांना समन्स बजावले. त्यांच्या घरांवर छापेमारी केली असता २० लाख रुपये रोख सापडले होते. त्यावेळी ते विदेशात होते. त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बळपूर्वक कारवाई न करण्याचे आदेश दिले. शहरातील गुटखा व सडकी सुपारी व्यापारावर डीआरआयची करडी नजर असून आतापर्यंत ७६२ मेट्रिक टन सुपारी जप्त करण्यात आली आहे. तिची किंमत कोटय़वधींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.