लोकसत्ता टीम

भंडारा : बाहेरून घरी परत जात असलेल्या एका ११ वर्षीय विद्यार्थ्याला एका स्कूल व्हॅनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भोजापूर मार्गावर घडली. या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. आदी रुपचंद बागडे (११, रा. भोजापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो संत शिवराम शाळेत इयत्ता सहाव्या वर्गात शिकत होता.

आदी सकाळी काही कामाने घराबाहेर गेला होता. सायकलने परत येत असताना भोजापूर मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कूल व्हॅनने त्याला चिरडले. एम एच ३६- एच ८४८६ क्रमांकाची ही खासगी स्कूल व्हॅन रॉयल पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. अपघातानंतर स्कूल व्हॅन चालकाने घटनस्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे काही अंतरावर नागरिकांनी या स्कूल व्हॅनला अडविले आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

आणखी वाचा-नागपूर : तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याच्या उपक्रमाला राज्यभर पसंती अन्…

आदीचे वडील रुपेश बागडे यांची घराशेजारी चहाची टपरी असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूने बागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. स्कूल व्हॅन चालकाकडून झालेल्या या अपघातामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

शहरासह जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर आणि भरधाव वेगाने चालणाऱ्या स्कूल व्हॅनचा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. शेकडो स्कूल व्हॅन चालकांकडे आजही परवाना नाही, भंगार झालेल्या स्कूल व्हॅनमध्ये कोंबून विद्यार्थी नेले जातात. सिलेंडर असलेल्या धोकादायक स्कूल व्हॅन रस्त्यावर सर्रास धावत आहेत. राज्य सरकारने तयार केलेल्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमावलीचा कोणताही नियम खासगी स्कूल व्हॅन चालकांकडून पाळला जात नसल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात परिवहन विभाग निद्रावस्थेत असल्याचा आरोप माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना अशा अनधिकृत स्कूल व्हॅनमधून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शाळेतील परिवहन समिती काय करत आहे ? आणखी किती विद्यार्थ्याचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल, असे प्रश्न उदापूरे यांनी उपस्थित केले आहे.