गडचिरोली : आदिवासी भाषिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक ठरलेल्या महाराष्ट्रातील मोहगाव येथील एकमेव गोंडी शाळेतील विद्यार्थी ऑनलाईन ‘लंडन’वारीने चांगलेच भारावले.ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून लंडनमधील ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा स्थळांना भेट दिली. या अनोख्या ऑनलाईन लंडनभ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी किंग्स क्रॉस स्टेशन, ब्रिटिश लायब्ररी, बेर्कबेक विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ हायजीन अ‍ॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन, आणि सेनेट हाऊस लायब्ररी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांना ऑनलाईन भेट दिली. विशेष म्हणजे या दौर्‍यात विद्यार्थ्यांनी तेथील काही विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करणे तसेच उच्च शिक्षणाबाबत गोडी निर्माण करणे हा होता. या उपक्रमामध्ये लंडनहून ऍड. बोधी रामटेके यांचे विशेष सहकार्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमध्ये जाऊन तेथील संधी आणि शिक्षणपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. ऍड. रामटेके हे स्वतः गेली दोन वर्षं युरोपातील विविध विद्यापीठांमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असून सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर सक्रिय काम करत आहेत.

मातृभाषेतील आणि सांस्कृतिक वातावरणातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या सहा वर्षांपासून मोहगाव ग्रामसभेद्वारे ही गोंडीशाळा गोंडी आणि इंग्रजी भाषांमध्ये चालवली जात आहे. मात्र, संविधानिक मूल्यांशी सुसंगत असूनही शाळेला अद्याप कोणतीही शासकीय मान्यता मिळालेली नाही. परिणामी, शाळेला अस्तित्वासाठी न्यायालयीन लढा लढावा लागत आहे. तरीही अनेक अडचणींचा सामना करत या शाळेचे प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच हा ऑनलाईन लंडनभ्रमंती उपक्रम राबवण्यात आला होता. या पुढेही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी अशा अनेक उपक्रमांची आखणी केली जाईल असे शिक्षक शेषराव गावडे यांनी सांगितले. या उपक्रमात शेषराव गावडे, अविनाश श्रीरामे, ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे व इतरांनी सहकार्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेचा कायेदेशीर संघर्ष

गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव ग्रामसभेने पुढाकार घेत सुरू केलेली महाराष्ट्रातील एकमेव गोंडी शाळा म्हणून या शाळेचा लौकिक असला आहे. मात्र, शाळेच्या अस्तित्वासाठी ग्रामसभेला कायदेशीर संघर्ष करावा लागतो आहे. धानोरा तालुक्यातील मोहगाव ग्रामसभेने २०१९ मध्ये ही शाळा सुरु केली होती. परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अशाप्रकारे शाळा सुरु करणे नियमाविरोधात असल्याचे सांगून शिक्षण विभागाने ही शाळा बंद करण्याचे निर्देश दिले होते. यावरून मोहगाव ग्रामसभेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर सुनावणी प्रलंबित आहे.