अमरावती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातील ग्रंथालयात सलग अठरा तास अभ्यास केला होता. पण, दिवसातले १८ तास अभ्‍यास करणे सोपे नाही. त्याची अनुभूती विद्यार्थ्‍यांना व्‍हावी, त्‍यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शनिवारी सकाळपासून सलग १८ तास अभ्‍यास करून डॉ. आंबेडकर यांना अनोख्‍या पद्धतीने आदरांजली वाहिली.

विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने ८ ते १४ एप्रिलदरम्यान समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अभ्‍यास उपक्रमाने त्याची सुरुवात झाली. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ओमराज गजभिये, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. मोहन खेरडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. बी. नायक, विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.

हेही वाचा – ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उठवत असल्याने मला लक्ष्य करण्यात आले – डॉ. आशीष देशमुख

डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, सलग अठरा तास अभ्यास करणे किती कठीण आहे, याची जाणीव या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थांना होईल. डॉ. आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय राहिलेले आहे. शारीरिक बंधने आपल्याला तोडता येतील, परंतु सामाजिक बंधने जी लादल्या गेली होती, ती खऱ्या अर्थाने त्यांनी तोडून बहुजनांना मुक्त केले. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून विकासाची मूल्ये आपल्याला दिली.

हेही वाचा – नागपूर : क्या बोलते पब्लिक, फुटपाथ गया कहा..? पल्लवीच्या ‘रॅप’ने उडवली महापालिकेची झोप

दरवर्षी अमरावती विद्यापीठ समता सप्ताह निमित्ताने अठरा तास अभ्यास हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थांना सुद्धा प्रेरणा मिळते. यंदा ७० विद्यार्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. संचालन डॉ. रत्नशील खोब्रागडे यांनी केले. रमेश जाधव यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.