महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात ६६० मेगाव्ॉटचे दोन संच असलेला प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे नागपुरात प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर होणार आहेत. हा मुद्दा उपस्थित करत विविध पर्यावरणवादी संघटनांनी गुरुवारी केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल समितीपुढे या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला. समितीचे अध्यक्ष डॉ. एन.पी. शुक्ला यांना याबाबत निवेदनही सादर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य गुरुराज कुंदरगी, डॉ. एस.के. पालीवाल, शास्त्रज्ञ डॉ. एस.के. अडप्पा, एन. सुब्रमण्यम उपस्थित होते. विदर्भ कनेक्ट, व्ही कॅन, संघर्ष जगण्याचा जनआंदोलन चळवळ यासह इतरही पर्यावरणवादी संस्थांकडून अ‍ॅड. मुकेश समर्थ, संदेश सिंगलकर, सुधील पालीवाल, प्रा. अवंतिका लेकुरवाळे, चंद्रगुप्त समर्थ, नितीन रोंगे, गोविंद डागा, ओ.पी. मिगलानी, विपुल इंगळे यांनी हा विरोध दर्शवला. यावेळी अ‍ॅड. मुकेश समर्थ म्हणाले, कोराडी प्रकल्पात २०१० मध्ये प्रदूषण कमी करणारी एफजीडी यंत्रणा लावायला सांगितल्यावरही ती लावण्यात आली नाही. वीज निर्मिती जास्त असल्याने येथे प्रदूषणही जास्त आहे. येथील वीज इतरत्र पाठवली जात असल्याने वीजहानी वाढते. त्यातच नाशिकसह इतरही काही प्रकल्पात नवीन संच लावणे शक्य आहे. बंद पडलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पातूनही वीज निर्मितीचे प्रयत्न गरजेचे आहेत. कोराडीत आधीच प्रदूषण जास्त असताना नवीन प्रकल्पाने स्थिती आणखी बिघडण्याचा धोका आहे. सुधीर पालीवाल म्हणाले, येथील राखेचा आजही १०० टक्के वापर नाही.

उचल होणाऱ्या राखेचा कृषीसाठी नियमबाह्य़ वापर होऊन प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित होतो. येथे प्रकल्प लावण्यापेक्षा नाशिकमध्ये लाववा. तेथे १०० टक्के राखेची उचल असल्याने प्रदूषण कमी होईल. त्यातच कोराडी प्रकल्पात तीन स्तरावर वृक्ष लावण्याच्या सूचनेचे महानिर्मितीने पालन केले नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संदेश सिंघलकर म्हणाले, देशातील सर्वाधिक कर्करुग्ण हे नागपुरात आढळत आहेत. त्याला हे प्रदूषणही कारणीभूत आहे. नवीन प्रकल्प झाल्यास प्रदूषणाचा स्तर वाढून शहरातील नागरिकांना जगनेच कठीन होईल.

शंभर टक्के सांडपाण्याचा वापर हे थोतांड

कोराडी- खापरखेडय़ातील  प्रकल्पात सांडपाण्याचा वापर होत असल्याचे महानिर्मितीकडून सांगण्यात येते.  हे पाणी पाईपमधून सांडपाणी प्रकल्पात घेऊन त्याचे शुद्धीकरण व्हायला हवे. परंतु येथे नागनदी व पोहरा नदीवर बंधारा  बांधून त्याचे पाणी शुद्धीकरण करून वापरले जाते. त्यामुळे पावसाच्या दिवसात त्यात सांडपाण्याऐवजी शुद्ध पाणीच जास्त आहे. येथील पाणी वीज प्रकल्पाला जाऊन शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याने हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी, संघर्ष जगण्याचा जन आंदोलन चळवळीच्या प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी केली.

समितीकडून प्रकल्पाची झडती

केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल समितीच्या पाच सदस्यांनी कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पांची झडती घेतली.  येथे प्रदूषण कमी करणारी एफजीडी यंत्रणा का लावली नाही, त्रिस्तरीय वृक्ष लावण्याचे काय झाले यासह इतरही प्रश्न विचारले. येथील प्रदूषन, त्याचे परिणात याबाबतही त्यांनी विचारणा केली. प्रकल्पाशेजारील गाव, तलावांचीही स्थिती विचारली.

दोन्ही बाजूने विचार करून निर्णय – डॉ. शुक्ला

पर्यावरणवादी संघटनेने कोराडी प्रकल्पाबाबत गंभीर मुद्दे मांडले आहेत. समितीकडून पाहणी केल्यावर या दोन्ही विषयांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतरच हा अहवाल मंत्रालयाला सादर केला जाईल, असे आश्वासन समितीचे अध्यक्ष डॉ. एन. पी. शुक्ला यांनी पर्यावरणवाद्यांना दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sub capital crisis due to proposed power project abn
First published on: 02-08-2019 at 14:28 IST