अमरावती: येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये जन्मजात कर्णबधीर (मूकबधीर) असलेल्या एका साडेचार वर्षांच्या बालकावर यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेनंतरची महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे ‘स्विच ऑन’ (साउंड प्रोसेसर ऍक्टिव्हेशन) नुकतीच पार पडली, आणि या क्षणी बालकाने पहिल्यांदाच आवाज ऐकल्याने उपस्थित सर्वच जणांसाठी तो एक अत्यंत भावनिक आणि आनंददायी क्षण ठरला. आवाज ऐकताच बालकाने दिलेला सकारात्मक आणि हृदयस्पर्शी प्रतिसाद उपस्थितांना गहिवरून टाकणारा होता.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके, सुप्रसिद्ध कॉक्लियर इम्प्लांट सर्जन डॉ. जीवन वेदी (विभागप्रमुख, नाक-कान-घसा विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर), तसेच ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेनंतर पुढील दोन वर्षांपर्यंत बालकाने नियमितपणे ऑडिओलॉजिस्टच्या संपर्कात राहून ऑडिओ-स्पीच थेरपी घेतल्यास त्याला बोलणे शिकणे सुलभ होईल.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, डॉ. जीवन वेदी, ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, औषध निर्माण अधिकारी योगेश वाडेकर यांनी या शस्त्रक्रियेत विशेष योगदान दिले.

गरीब आणि गरजू रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत आधुनिक आणि महागड्या उपचार सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या यशस्वी आणि दुर्मीळ शस्त्रक्रियेमुळे एका बालकाच्या आयुष्यात अमूल्य बदल घडून आला आहे, याबद्दल आमदार संजय खोडके यांनी डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय प्रशासन आणि सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाला डॉ. माधव ढोपरे, डॉ. विक्रांत कुळमेथे, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. जयश्री पुसदेकर, डॉ. निघोट यांच्यासह रुग्णालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया म्हणजे काय?

कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ही जन्मजात बहिरेपणा असलेल्या बालकांसाठी शब्दशः वरदान असली तरी, या शस्त्रक्रियेचा किमान खर्च हा सात ते आठ लाखांच्या घरात जातो. यामध्ये एकट्या इम्प्लांटचा खर्च हा सहा लाखांच्या पुढे असतो आणि त्यानंतर शस्त्रक्रिया व पुन्हा शस्त्रक्रियेनंतर विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेतल्यानंतरच या शस्त्रक्रियेचा खऱ्या अर्थाने उपयोग होऊन ठार बहिरेपणासह जन्मलेले मूल ऐकू लागते, बोलू लागते आणि सर्वसामान्य मुलांप्रमाणे आत्मविश्वासाने आयुष्य जगू लागते.