चंद्रपूर : राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात विकास कामांचा झंझावात सुरू केला आहे. त्यांची विकासाभिमुख भूमिका बघता मी सुधीरभाऊच्या संपर्कात आहे असे मत काँग्रेस समर्थित नागपूर शिक्षक विभागाचे विधान परिषदेचे अपक्ष आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले.चंद्रपूर येथील राम सेतू पुलाचे आकर्षक रोषणाईचे लोकार्पण राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी झाले. या कार्यक्रमाला आमदार अडबाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी अडबाले यांनी मुनगंटीवार यांच्या एकूणच कामाच्या धडाक्यावर स्तुतीसुमने उधळली व कार्याचा गौरव केला. राज्याची राजकीय परिस्थिती सध्या अस्तिर आहे. राज्यात आता भाजप – शिंदे शिवसेना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. या महायुती सरकारची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच काँग्रेस समर्थित अपक्ष आमदार सुधाकर अडबाले यांनी मी मुनगंटीवार यांच्या संपर्कात आहे असे म्हणताच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्रत्यक्षात आपण विकास कामासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संपर्कात आहे असे आमदार अडबाले यांना म्हणायचे आहे.