वर्धा : मजबूत पक्ष यंत्रणा, तगडी उमेदवारी, सक्षम साधनसामग्री एवढे असून भागत नाही. या सर्व गोष्टीत ताळमेळ ठेवून मार्गी लावणारा एक कुशल व्यवस्थापक निवडणुकीत आवश्यक ठरतो. अन्यथा सर्व पाण्यात, असे जाणकार म्हणतात. हॅटट्रिक साधायला निघालेले भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सध्याच्या प्रचारस्थितीबाबत असेच बोलल्या जाते. विविध पातळीवर समन्वय नसल्याची ओरड सुरू झाली होती. सध्याची कोअर टीम निवडणूक अनुभव नसल्याने विस्कळीत आहे, असे बोलल्या जात होते. हे हाताळणारा अनुभवी माणूस अद्याप हजर झाला नसल्याचे कारण यासाठी दिले गेले. भाजप यंत्रणेस अपेक्षित तो कुशल सहकारी म्हणजे सुधीर दिवे होत.

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत दिवे यांचे व्यवस्थापन कौशल्य सर्वांनी मान्य केले होते. आज तर त्यांची तीव्र गरज आहे. त्यांना बोलवा, असे हाकारे सुरू झाले. पण ते आले नाही. कारण दिवे यांच्याकडे नागपुरात नितीन गडकरी यांच्या प्रचार नियोजनाची जबाबदारी होती. वर्षभर हाती घेतलेले काम सोडून वर्ध्यात कसा येवू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हा सकाळी अकरापर्यंत ते रात्री दहानंतर या वेळेत आमचे काम मार्गी लावून जात जा, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. मान्य करणे त्यांना शक्य झाले नव्हते.

हेही वाचा…मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…

आता ते येत आहे, कारण नागपुरातील त्यांच्यावरील जबाबदारी आटोपली आहे. वर्ध्याकडे निघालो आहे, असे त्यांनी विचारणा केल्यावर सांगितले. ते मूळचे आर्वीचे. पण वर्ध्यात तळ ठोकणार, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रसंगी कोणताही मार्ग पत्करून काम मार्गी लावणारा माणूस, अशी त्यांची ख्याती भाजपकडून सांगितल्या जाते. आताही उमेदवार तडस यांच्या निवडणूक तयारीतील उणिवा शोधण्याची प्राथमिक जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्या दूर करीत सर्व सुरळीत करण्याची भूमिका ते पार पाडतील. लढाई आपल्या टप्प्यात आणण्याचे कौशल्य त्यांच्याकडून अपेक्षित असल्याचे एका संघटन नेत्याने नमूद केले. ते आले आणि पावले, असं हा पदाधिकारी म्हणाला.