चंद्रपूर : माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार हे लवकरच मोदींच्या मंत्र्याला भेटण्याची तयारी करीत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत १५ ते २० आमदार असण्याची शक्यता आहे. रेल्वेशी संबंधित विविध विकास कामे, समस्या आणि सुविधांच्या मागणीसाठी पूर्व विदर्भातील १५ ते २० आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. वन्यप्राण्यांसाठी अंडरपास, चंद्रपूर- नागपूर ब्रॉडगेज मेट्रो, रेल्वेचे वेळापत्रक इत्यादी सर्व विषयांच्या पुस्तिका तयार करून रेल्वेमंत्री वैष्णव यांना देणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन पत्रपरिषदेनंतर आमदार मुनगंटीवार यांनी या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. तेलंगणा, आंध्रप्रदेश व छत्तीसगड लागून असल्याने चंद्रपूर-गोंदिया या २४० किलोमीटरच्या दुसऱ्या लाईनमुळे या भागातील व्यापाराला सर्वाधिक लाभ होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यासोबतच चंद्रपूर तसेच विदर्भातील इतरही जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध प्रश्न, समस्या आणि सुविधा व विकासाचे मुद्दे आहेत. आमदाराने रेल्वेमंत्र्यांशी एकेक करून भेट घेतली तर हे प्रश्न लवकर निकाली निघणार नाहीत. त्यामुळे पूर्व विदर्भातील १५ ते २० आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमच्यासोबत कोणताही आमदार आला तर मी सर्वांना सोबत घेईन. सर्वांनी एकत्र जमल्यास चर्चेला अधिक वेळ मिळेल आणि महत्वही प्राप्त होईल. बल्लारशाह-गोंदिया रस्त्यावर वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. यामध्ये वन्यप्राणी बघता अंडरपासेस व इतरही उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती आहे. पोंभूर्णा येथे ३० हजार एकरमध्ये औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. येथे जिंदल व मित्तल हे मोठे उद्योग समूह उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत. मात्र जमिनीच्या प्रश्नामुळे सध्या हे सर्व प्रस्ताव पाईप लाईनमध्ये आहे. तसेच पोंभूर्णा तालुक्याला रेल्वेशी कनेक्ट करणार आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळा असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपुरातील प्रस्तावित प्रकल्प, गुंतवणूक, पोंभूर्णा येथील गुंतवणूक आदींबाबत मुनगंटीवार यांनी यावेळी चर्चा केली.
पुणे-चंद्रपूर रेल्वेगाडी लवकरच
पुणे-चंद्रपूर रेल्वेगाडी लवकरच सुरू होणार आहे. हा मुद्दा रेल्वे बोर्डाकडे आला आहे, यासंदर्भात तसे पत्र देखील प्राप्त झाले आहे. चंद्रपूर-मुंबई थेट रेल्वे सुरू करावी अशी मागणी केली आहे. मात्र ही गाडी सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचण असल्याचे रेल्वेने कळविले आहे.- किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर.