बुलढाणा: मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वन जमिनीवरील आदिवासी बांधवानी केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी वन विभागाने केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कारवाई दरम्यान वन, पोलीस विभाग आणि अतिक्रमण धारक आदिवासी बांधवात झालेल्या हिंसक संघर्षातील आरोपी असलेल्या आदिवासी व्यक्तीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तीने लिहिलेल्या पत्रात भावना व्यक्त केल्या.
दरम्यान या आदिवासी व्यक्तीची प्रकृती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर स्थानिय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बुलढाणा मलकापूर राज्य महामार्गवरील मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वन जमिनीवरील अतिक्रमण २३ जुलै २००५ रोजी काढण्यात आले. या कारवाईत वन विभागाने वन जमिनीवर भिल्ल समाज बांधवानी केलेले शेती व घरांचे अतिक्रमण उध्वस्त केले होते. अतिक्रमण काढताना वनविभाग आणि अतिक्रमणधारक आदिवासींमध्ये मोठा संघर्ष झाला. यामध्ये पोलीस, वन कर्मचारी आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले. शासकीय वाहनांचे नुकसान झाले होते.
याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून २५ आदिवासी बांधवाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे आणि अजूनही पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले जात आहे. यातील आरोपी फरार असलेले भीमसिंग गायकवाड यांनी अटकेच्या भीतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
सरकारला न्यायासाठी सादर विनंती..
भीमसिंग शिवाजी गायकवाड यांनी आपल्या सुसाईड नोट च्या प्रारंभी जय गणेशाय,जय आदिवासी, जय एकलव्य असा उल्लेख करून सरकारला न्यायासाठी सादर विंनंती असा उल्लेख केला आहे. मागील ३० वर्षांपासून माळेगाव येथे अतिक्रमित जागेवर शेती करून घर बांधले आहे. भर पावसात वन विभागाने कारवाई करीत शेती व घर उध्वस्त केले. याला वन विभाग जवाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ‘ घर मोडले, दार मोडले, उघड्यावर राहणार कसे? जमीन मोडली, घरट मोडलं, पोट भरणार कसं? अश्या दगडालाही पाझर सोडणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत. तसेच येत्या १० ते १५ दिवसांत अनेक आदिवासी आत्महत्या करतील असा गंभीर इशारा त्यांनी चिठठी अंती दिला आहे. यामुळे आता तरी निरढावलेले सरकार, प्रशासन, वन विभाग जाग होईल का? असा यक्ष प्रश्न एरणीवर आला आहे.