विदर्भातील चंद्रपूर जिल्हा म्हणजे वाघांसाठी जणू नंदनवनच! वाघांच्या अधिवासासाठी अंत्यत पोषक वातावरण असल्याने या जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात तब्बल ५२ वाघांनी आश्रय घेतला आहे, त्यात ३९ वाघिणी आहेत. विशेष म्हणजे यातील २२ वाघिणींनी आतापर्यंत सुमारे ६७ बछड्यांना जन्म दिला आहे. ताडोबा- अंधारी प्रकल्पानंतर ब्रह्मपुरी वनक्षेत्रात व्याघ्रसंख्या अधिक आहे.

ब्रह्मपुरी वनक्षेत्रात २२ वाघिणी बछड्यांबरोबरच जंगल भ्रमंती करत असतात. यातील १६ बछडे सध्या वयात आले आहेत. त्यामुळे वाघाचे कुटुंब दिसून आले नाही, असा एकही दिवस जात नाही. वाघांच्या संरक्षित क्षेत्राबाहेरही वाघांची संख्या वाढण्यासाठी इतके चांगले वातावरण असल्याचे बघून व्याघ्रप्रेमीही आनंदले आहेत.

ब्रह्मपुरी वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर. आणि ब्रह्मपुरी वन विभागात कार्यरत जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व गाभा क्षेत्रात सर्वाधिक वाघ आहेत. त्यानंतर ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या जंगलात वाघांची संख्या अधिक आहे. केवळ वाघांचीच संख्या जास्त नाही, तर ब्रह्मपुरीच्या जंगलात असलेल्या एकूण ५२ वाघांपैकी ३९ वाघिणी आहेत. त्यातील २२ वाघिणींनी ६७ बछडे दिले आहेत. वाघिणींकडून बछड्यांना जन्म देण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे बछड्यांची संख्याही वढत चालली आहे. वाढत्या वाघांमुळे संघर्षाची वेळ येऊ नये म्हणून जंगलाशेजारच्या गावात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन विभाग वेळोवेळी अभियान राबवत आहे.

दुसरी बाजू अशीही…..

या परिसरात वाघांची संख्या वाढत असल्याची सुवार्ता सर्वदूर पसरत असतानाच मानव-वन्यजीव संघर्षाची भीतीही वाढत आहे. परिसरातील सुमारे ४२१ गावे अतिसंवेदनशील आहेत. २०१८ ते २०२५ या सात वर्षांच्या कालावधीत ८९ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. यातील मरण पावलेल्या ९० टक्के व्यक्ती या ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आहेत. बछड्यांबरोबर असलेल्या वाघिणींनीच हे बळी घेतल्याचे सांगितले जात आहे.