नागपूर : मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. न्यायालयाने हा जामीन मंजूर करताना अटी आणि शर्ती लागू करण्याचा अधिकार कनिष्ठ न्यायालयावर सोपवला आहे. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर गवळीच्या सुटकेवर पुढचा निर्णय होणार आहे. त्यामुळे जामीन मिळाला तरी तुर्तास त्याचा मुक्काम सोमवारपर्यंत नागपूर मध्यवर्ती कारागृहातच राहणार आहे.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची २००७ मध्ये हत्या झाली होती. या खटल्यात गवळीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. तेव्हापासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदी आहे. दरम्यान दीर्घ तुरुंगवास आणि वाढते वय लक्षात घेता गवळीने न्यायालयाकडे विनंती अर्ज करीत जामीन मागितला होता. त्यावर न्या. एम एम सुंदरेश आणि न्या. एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीने १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्याची नोंद घेतली. त्याचे वय ७६ वर्षे झाल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

अंतीम सुनावणी पुढच्या फेब्रुवारीत

गवळीला जामिन मंजूर करताना नियम व अटी ठरविण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयावर सोपवले आहेत. गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या ९ डिसेंबर २०१९ च्या निकालाला आव्हान दिले. यात त्याने कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. गवळीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय फेब्रुवारी २०२६ मध्ये अंतिम सुनावणी देणार आहे.

राजकीय प्रवास

भायखळा येथील दगडी चाळीतून अरुण गवळी कुप्रसिद्ध झाला. अखिल भारतीय सेनेची स्थापना करत त्याने विधानसभा निवडणूकही लढवली. तो २००४-२००९ पर्यंत मुंबईच्या चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार होता. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या झाल्यानंतर गवळीला आणि त्याच्यी इतर इतरांना २००६ मध्ये अटक करून खटला चालवण्यात आला. मुंबईतील सत्र न्यायालयाने ऑगस्ट २०१२ मध्ये त्यावर निकाल देताना अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेंव्हा पासून गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.