अमरावती : दर्यापूर येथील मुख्य मार्गावरील शंभर वर्षापुर्वीच्या सुमारे आठ झाडांची तोड झाली. मात्र, इतर झाडांची नगरपालिकेने कत्तल करू नये, यासाठी पर्यावरण प्रेमींनी लढा उभारला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले. अखेरीस या लढ्याला यश प्राप्त झाले असून सर्वोच्च न्यायालयाने एकही झाड तोडू नका, असे आदेश दिले आहेत.
हे जलवृक्ष चळवळीच्या प्रयत्नांचे यश असल्याची प्रतिक्रिया संकल्पक विजय विल्हेकर यांनी दिली. जलवृक्ष प्रेमींच्या पुढाकारात आठ वर्षांपासून एसटी डेपो ते शिवाजीनगर रोडवरील ब्रिटिशकालीन झाडे जपण्यासाठी जलवृक्ष चळवळीने निकराचा लढा दिला.
ही झाडे पाडू नका असे ८० ते ९० वर्षांच्या ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सर्वांची मागणी असताना तसेच रस्ता बांधण्यात यावा, अशी मागणी नसताना तत्कालीन नगरपालिका मुख्याधिकारी नंदू परळकर यांनी मागील अडीच वर्षांत दोन टप्यांत ८ वारसा झाडे कापली.
विजय विल्हेकर यांच्या पुढाकाराने एसटी डेपो ते शिवाजीनगर मार्गावरील ब्रिटिश कालीन झाडे जपल्या जावीत यासाठी झाडांना वस्त्र परिधान करून झाडांचे वाढदिवस साजरे केले.
दरम्यान, पुरातन उर्वरित झाडे वाचवण्यासाठी जलवृक्ष चळवळीने उभा केलेला न्यायालयीन लढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एकही झाड तोडू नका, असे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयात जलवृक्ष चळवळ आणि वृक्षप्रेमींच्या बाजूने वकील अॅड. अमोल एन. सूर्यवंशी व अॅड. राहुल जे. शिंदे यांनी युक्तिवाद केला, असे विजय विल्हेकर यांनी सांगितले आहे.
दर्यापूर ही भूमी संत गाडगेबाबा, डॉ.भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची कर्मभूमी आहे. संत गाडगेबाबांनी कित्येकदा झाडाखालचा रस्ता झाडून काढला असेल. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या कित्येक सभा या झाडांच्या सावलीत घेतल्या असतील. हा या झाडांच्या सावलीचा इतिहास आहे, अशी भावना विजय विल्हेकर यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दर्यापूरकरांनी प्रचंड आनंद व्यक्त केला.
या लढ्यात बंडू शर्मा, अॅड. विद्यासागर वानखडे, विजय लाजूरकर, अनिरुद्ध वानखडे, दर्शन दीपक गवई, मालिनी पाटील, वर्षा अग्रवाल, संगीता पुंडे, अॅड. सुजाता वानखडे, वर्षा अग्रवाल, सिंधू विल्हेकर, जयश्री चव्हाण, सुनीता मांडवे, मनोज रेखे, मनोज तायडे, अनिल गवई, शेखर रेखे, नरेश मोहता, डॉ. कांबळे, यश कांबळे, माणिकराव मानकर, गणेश लाजूरकर, गजानन देशमुख, गजानन देवके, शरद रोहनकर, रमेश भले, सदानंद तिडके, सुभाष किटे, अॅड मुकुंद नळकांडे अशा असंख्य निसर्गप्रेमींनी सहभाग दिला.