गडचिरोली : तब्बल ५० गुन्ह्यात आरोपी असलेल्या संशयित नक्षलवाद्याची १३ वर्षानंतर ४९ गुन्ह्यातून सुटका झाली. बिरजू पित्तो पुंगाटी (३६, रा. गोडेली, ता. एट्टापल्ली) असे त्याचे नाव आहे. वयाच्या २४ व्या वर्षी पोलिसांनी पहिल्यांदा त्याला अटक केली होती. तब्बल १३ वर्षे तो कारागृहात राहिला. ३ ऑगस्टला तो कारागृहातून बाहेर पडला.

पुंगाटी याला सर्वप्रथम फेब्रुवारी २०१२ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर ५० गुन्ह्यांत आरोपी करण्यात आले होते. एका गुन्ह्यात त्यास न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असून त्याचा अंतिम निकाल येणे बाकी आहे. ४८ प्रकरणांत तो निर्दोष सुटला होता. ४९ व्या प्रकरणांतही त्याची निर्दोष मुक्तता झाली.

२० मे २००९ रोजी धानोरा ते मुरूमगाव मार्गावर हत्तीगोटा पहाडीजवळ नक्षलवाद्यांनी झाडे तोडून रस्त्यावर टाकून मार्ग अडवून ठेवला होता. त्यामुळे दोन पोलीस अधिकारी व १४ जवान घटनास्थळी रवाना झाले. त्यांना दीडशे ते दोनशे नक्षलवाद्यांनी घेरले होते. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी मुरूमगाव पोलीस मदत केंद्राला कळविले होते. मात्र, येरकडजवळ नक्षलवाद्यांनी रस्त्यावर दगडे टाकून ठेवल्याने वाढीव कुमक तेथे पोहोचू शकली नाही. यावेळी नक्षल्यांनी दोन पोलीस अधिकारी व १४ जवानांना ठार केले होते. यानंतर त्यांची शस्त्रे पळवून ते जंगलात पसार झाले होते. या गुन्ह्यात २५ मे २०२२ ला पुंगाटीला अटक करण्यात आली होती. संशयित पुंगाटी सुरुवातीला भंडारा व नंतर नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात होता.

गुन्हे सिद्ध करण्यात पोलीस अपयशी

या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. विनायक जोशी यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाने एकूण १५ साक्षीदार तपासले परंतु ते सदर आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल काहीही सांगू शकले नाही. तसे पुरावेही देता आले नाहीत. त्यामुळे जिल्हा व सत्र न्या. विनायक जोशी यांनी २ ऑगस्ट रोजी निकाल देऊन त्याची निर्दोष मुक्तता केली. सरकारच्या बाजूने सरकारी वकील ॲड. नीलकंठ भांडेकर यांनी तर बिरजू पुंगाटी याच्यातर्फ ॲड.जगदीश मेश्राम यांनी बाजू मांडली.