नागपूर: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या शंकेवरून पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजता शितलामाता चौक परिसरात घडली. अनुसया ऊर्फ दिव्या गजाम (२४) असे खून झालेल्या नवविवाहितेचे तर श्यामकिशोर तेजलाल गजाम (२७) असे आरोपी पतीचे नाव आहे.
काही महिन्यांपूर्वीच दिव्या आणि श्याम यांचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर दिव्या ही नातेवाईकाशी संपर्कात होती. श्यामने तिला त्या युवकाशी न बोलण्याची तंबी दिली होती. मूळच्या कटंजी,बालाघाट-मध्यप्रदेश येथे हाताला काम नसल्याने तो बेरोजगार होता. गेल्या १० दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात श्याम हा पत्नीला घेऊन नागपुरात आला. ईपीएफ कार्यालयाच्या शासकीय निवासस्थानात तो पत्नीसह राहत होता.
हेही वाचा… रुग्णांचा जीव टांगणीला.. पूर्व विदर्भातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर..
पत्नी फोनवरून कुणाशीतरी बोलत असल्यामुळे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. मंगळवारी रात्री श्याम घरी आला. त्यांच्यात वाद झाद झाला. श्यामने लोखंडी पाईपने पत्नीच्या डोक्यावर हल्ला केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर तो घरातून पळून गेला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सक्करदरा पोलिसांनी श्यामकिशोरवर खुनाचा गु्न्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.