सिंदखेड राजा येथील बसस्थानकात मुक्कामी असलेल्या बसगाड्यांमध्ये थांबले नसल्याचे आढळून आल्याने मेहकर आगारातील ११ चालक व वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. वाहक तपासणी पथकाला कर्मचारी मुक्कामी बसमध्ये आढळून न आल्याने विभागीय कार्यालयाचे वाहतूक अधीक्षक (अपराध) यांनी ही कारवाई केली. या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा एसटी कष्टकरी महासंघाने घेतला आहे.
हेही वाचा >>>बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला; राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी, चंद्रपूर जिल्ह्यात २८ एप्रिलला निवडणूक
१५ मार्च रोजी सिंदखेडराजा येथील बसस्थानकात मेहकर आगाराच्या मुक्कामी असलेल्या बसगाड्यांची पथकप्रमुख गो. हिं. काकडे यांनी तपासणी केली. यावेळी रात्री साडेदहा वाजता कर्तव्यावरील ११ चालक व वाहक तेथे आढळून आले नाही. याबाबतचा अहवाल त्यांनी विभागीय कार्यालयास सादर केला असता विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) यांनी अकरा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये रमेश भालेराव, अनंता मुंढे, आर.बी. मुंढे, दिनकर घुगे, गणेश देव्हरे, विलास वाघमारे या चालकांचा तर संदीप गीते, लता चौधरी, के.एस. घुगे, रिता राठोड, रमा चव्हाण या वाहकांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>चंद्रपूर: ‘वाचाल तर वाचाल’, नवरगाव येथे विदर्भातील पहिली वाचन संस्कृती कार्यशाळा
या कारवाईत महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असून रात्री बसमध्ये महिला कर्मचारी कशा काय मुक्कामी राहू शकतील, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे. हे सर्व कर्मचारी जेवणासाठी गेले होते, तेव्हा तपासणीची कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई चुकीची असल्याचे संघटनेचा दावा आहे. दरम्यान, निलंबन मागे घेण्याची मागणी एसटी कष्टकरी महासंघाने विभाग नियंत्रकांना आज पत्र देऊन केली. कारवाई मागे न घेतल्यास आगार बंद करण्यात येईल, असा इशारा विभागीय सचिव राम सवडदकर, आगार अध्यक्ष अनिल पचपोर व सचिव छगन मुळे यांनी दिला आहे.