बुलढाणा : सिंदखेडराजा येथे अवैध वाळू तस्करांविरुद्ध आज मोठी कारवाई करण्यात आली. यात तहसीलदार प्रवीण धानोकर यांनी ५०० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला. जप्त केलेला वाळू साठ्याचा त्याच ठिकाणी लिलाव करण्यात आला. वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटीसुद्धा यावेळी नष्ट करण्यात आल्या.

हेही वाचा >>> अकोला : अवैध सावकारीविरोधात छापेमारी, आणखी तीन ठिकाणी…

सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मेहकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला. एकाच कारवाईत पाचशे ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्याची कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. जप्त करण्यात आलेली वाळू त्याच दिवशी त्याच जागेवर लिलाव करून संबंधिताना देण्यात आली. सिंदखेडराजाचे तहसीलदार धानोकर यांच्या चमूने खडकपूर्णा प्रकल्पामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटींचा शोध घेऊन वाळू उपसासाठी लागणारे साहित्य त्याच ठिकाणी नष्ट केले.

हेही वाचा >>> अरुण गवळीच्या सुटकेबाबत आता सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार…

…तर ‘एनपीडीए’अन्वये कारवाई – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी या धडक कारवाईचे कौतुक करीत सिंदखेडराजा चमूचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील तहसीलदारांनी अवैध वाळू साठाच्या ठिकाणांचा तपास घेवून तत्काळ अशीच कारवाई करावी. संकलित केलेल्या साठ्यावर छापा टाकून जागेवरच लिलाव करावा. याबाबत  जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत देण्यास तत्पर आहे. जिल्ह्यातील गाव, परिसरनिहाय वाळू माफियांची ओळख पटवावी. त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल होतील याची खातरजमा करावी, त्यांच्या विरुद्ध स्थानबद्ध किंवा एनपीडीएची कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली आहे.