वर्धा : लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक घटक शासनाकडून अपेक्षा ठेवून असतो. राजकीय प्रणालीत मग या घटकास खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणुकीत तर मग आश्वासनांची भरमार होते. निवडून आले की आमचे काय, असा सवाल उठतो. तसेच आता तेली समाजाचे झाल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाज नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आले की तुमच्या मागण्या मार्गी लावणार, अशी हमी दिली होती.
समाज संघटनेने त्या बैठकीत काही मागण्या प्रामुख्याने मांडल्या होत्या. महत्वाची मागणी म्हणजे संत संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळास ५०० कोटी रुपये मदत देण्याची होती. तेव्हा सरकार आल्यावर ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच मंडळ मार्गी लावून त्यावर समाजाचे प्रतिनिधी नेमणे, पारंपरिक तेलघाणी उद्योगाच्या विकासासाठी मध्यप्रदेश व अन्य राज्याच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करणे, सुटे तेलविक्रीवरील निर्बंध उठविणे, सिडकोत बांधकामसह भूखंड, सुदुंबरे येथे संस्थान विकासासाठी २०० कोटी रुपये, समाजातील मुलांच्या उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी नवी मुंबईत भूखंड या व अन्य मागण्या त्या बैठकीत झाल्या होत्या.भाजप सरकार सत्तेवर आले की या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.
आता नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची उजळणी केली. त्यावर बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की सरकार तेली समाजाच्या पाठीशी खंबीर उभे आहे. मागण्या पूर्ण केल्या जातील, अशी खात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे शिष्टमंडळाचे नेते व माजी खासदार रामदास तडस यांनी सांगितले. तसेच या बैठकीत आगामी जून महिन्यात देवळीत समाजाचा राज्यव्यापी मेळावा होत आहे. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले, अशी माहिती तडस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत आमच्याशी केलेल्या चर्चेत आमचे समाधान झाले, असे ते म्हणाले.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करतांना समाजनेते डॉ. भूषण कर्डीले, गजानन नाना शेलार, संजय विभुते, बळवंतराव मोरघडे, अतुल वांदिले, पुष्पाताई बोरसे, कुणाल पडोळे, नंदकुमार पाटील, प्रवीण बावनकुळे आदी उपस्थित होते.