नागपूर. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे पालकांची मुलांच्या तयारीसाठी खरेदीची लगबग सुरू आहे. त्यात मोसमी पाऊसही उंबरठ्यावर येऊन बसला आहे. अशा वेळी शहरातला अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या रिंगरोडवर पुढील दोन दिवस वाहतूकीचा खोळंबा होणार आहे. दक्षिण नागपुरातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी या मार्गावरील वाहतूकीत तात्पुरता बदल होणार आहे. परिणामी नागपूरकरांच्या डोक्याला ताप वाढणार आहे.
दक्षिण नागपुरात महावितरणने बेसा पॉवर हाऊस चौक ते म्हाळगी नगर चौकादरम्यानच्या रस्त्याखालील ११ केव्ही जानकीनगर भूमिगत वीजवाहिनीचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शुक्रवार, २० जून आणि शनिवार, २१ जून ला रिंगरोडजवळ खोदकाम आवश्यक झाले आहे. त्यामुळे या मार्गावरी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल होतील. नागरिकांना या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
नादुरुस्त वीजवाहिनी दुरुस्तीमुळे बेसा पॉवर हाऊस चौक ते म्हाळगी नगर चौक दरम्यानचा रस्ता दुरुस्ती कामासाठी पूर्णपणे बंद असेल. या काळात वाहन कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल होतील.
– बेसा पॉवर हाउस चौक ते म्हाळगी नगर चौक दक्षिण नागपुरातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी दरम्यानचा रस्ता बंद असेल. त्यामुळे बेसा पॉवर हाउस चौकाकडुन जाणारी सर्व वाहतूक अशी वळविली जाईल.
– बेसा पॉवर हाउस चौकाकडुन डावे वळण घेवून संत गजानन नगर चौकातुन उजवे वळण नंतर न्यु नेहरू नगर चौकातून उजवे वळण. घेत म्हाळगी नगर चौका मार्गे जावे लागेल.
– दिघोरी उड्डानपुलावरून म्हाळगी नगर चौक व तानबागकडून चामट चक्की मार्गे म्हाळगी नगर चौकाकडे जाणारी वाहतूक, दिघोरी नाक्याकडून चामट चक्की चौक मार्गे म्हाळगी नगर चौकाकडे जाणारी जड वाहतूक वळविली जाईल.
– दिघोरी उड्डानपुलाखालून चामट चक्की चौकातून डावे वळण घेवून दिघोरी नाका मार्गे जबलपुर हायवे चौकातुन उजवे वळण घेवून सोयीनुसार मार्गक्रमण करावे लागेल.
– ताजबाग कडुन चामट चक्की चौक मार्गे म्हाळगी नगर चौकाकडे जाणारी वाहतूक चामट चक्की चौकातून सरळ दिघोरी नाका मार्गे जबलपूर महामार्ग चौकातून उजवे वळण घेईल.
– दिघोरी नाका चौकाकडुन चामट चक्की चौक मार्गे म्हाळगी नगर चौकाकडे जाणारी जड वाहतूक चामट चक्की चौकातुन यु टर्न घेवून दिघोरी नाका मार्गे जबलपूरमहामार्गावर जाईल.
गणेशपेठ भागात आज सकाळी वीज खंडित
वीज वाहिनीच्या दुरुस्ती तसेच नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवार, २० जून रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत ११ केव्ही गणेशपेठ उच्चदाब वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित राहणार आहे. या कामामुळे गणेशपेठ, मॉडेल मिल चौक, गादीखाना, जोहरिपूरा, राम कुलर चौक, जोग गल्ली, सिंगाडा मार्केट, आंबेडकर वाचनालय, बजरंग चौक, चांदीपुरा, मटन मार्केट चौक या परिसरातील वीजपुरवठा बाधित राहील. त्यामुळे नागरिकांच्या डोक्याता ताप वाढणार आहे. या दुरुस्ती कामामुळे होणाऱ्या वाहतूक बदलास सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.