जिल्ह्यातील मोठी शहरे व गावखेड्यात नव्याने उदयास येत असलेल्या गुन्हेगारीस प्रतिबंध लावण्यासाठी ‘पोलीस ऑन रोड’ ही संकल्पना पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली आहे. आगामी काळात सण, उत्सव शांततेत पार पडावे म्हणून पोलिसांचा ताफा रस्त्यावर उतरून संशयितांची झाडाझडती घेणार आहे.

मागील चार दिवसांपासून खुद्द पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, ठाणेदार नंदकिशोर पंत, ठाणेदार मनोज केदारे, ठाणेदार दीपमाला भेंडे आदी अधिकारी अधीनस्त कर्मचाऱ्यांसह सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रस्त्यावर संशयितांची झाडाझडती घेत आहेत. यवतमाळातील पाटीपुरा, चमेडियानगर, वडगाव, पिंपळगाव, नेताजीनगर, लोहारा आदी ठिकाणी पायी पेट्रोलिंग करण्यात आली.

हेही वाचा >>>बळीराजाचे अश्रू कोण पुसणार !; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची नुकसान पाहणीकडे पाठ, शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही पोहोचले नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सराईत गुन्हेगार, संशयित चारचाकी, दुचाकीधारकांची तपासणी करण्यात येत आहे. ‘पोलीस ऑन रोड’ ही संकल्पना सर्व उपविभागात राबवून गुन्हेगारीस आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांसह बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचीही माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही या निमित्ताने पोलिसांनी केले आहे.