जे. एस. फायनान्स अॅण्ड कॅपिटल सव्र्हिसेस कंपनी स्थापन करून शेकडो लोकांना कोटय़वधींचा गंडा घालणाऱ्या जयंत झांबरे आणि वर्षां जयंत झांबरे हे जामिनावर कारागृहाबाहेर असून ते पोलिसांच्या मदतीने संपत्तीची विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
दर महिन्याला सहा टक्के व्याजाचे आमिष दाखवून जयंत झांबरे आणि वर्षां झांबरेने लोकांकडून कोटय़वधींची गुंतवणूक स्वीकारली होती. कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही आणि लोकांचे मुद्दलही परत केले नाही. गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच २२ मे २०१२ रोजी लोकांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी प्रथम वर्षां झांबरेला अटक केली होती, तर जयंत झांबरे हा अनेक दिवस फरार होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २०१२ रोजी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
झांबरे दाम्पत्याने शेकडो लोकांना कोटय़वधींचा गंडा घातला असून आर्थिक गुन्हे विभागाला २९५ लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीनुसार झांबरे दाम्पत्याने पन्नासवर कोटींनी लोकांना लुबाडले. आता हे दाम्पत्य जामिनावर बाहेर आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास पूर्ण करून डिसेंबर २०१२ आणि जानेवारी २०१३ मध्ये महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंध संरक्षण कायद्याच्या विशेष न्यायालयात आरोपींविरुद्ध दोन आरोपपत्र दाखल केले. तसेच तपासादरम्यान झांबरे दाम्पत्य आणि त्या कुटुंबीयांच्या नावावर असलेले दोन दुकाने, १३ भूखंड, २ गाळे, १ विमा पॉलिसी आणि २२ लाख ६५ हजार रुपयांची संपत्ती जप्त करून ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली.
जामिनावर कारागृहाबाहेर आल्यानंतर झांबरे दाम्पत्याने पुन्हा आपले जुने धंदे सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे जुने गुंतवणूकदार पैसे परत मिळविण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी नव्याने पुन्हा व्यवसायाला गती देण्यासाठी जयंत झांबरे आणि वर्षां झांबरे हे जप्त करण्यात आलेली संपत्ती पोलिसांच्याच मदतीने विकत असल्याची माहिती असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर कार्यालयातील खासगी स्वीय सहाय्यकाने आर्थिक गुन्हे विभागाच्या प्रमुख दीपाली मासिरकर यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे लोकांनी अधिक सावध होण्याची आवश्यकता आहे.
‘लेखी तक्रार दाखल नाही’
झांबरे दाम्पत्य पोलिसांच्या मदतीने जप्त करण्यात आलेली संपत्ती विकत असल्याची तक्रार करण्यासाठी दोन व्यक्ती कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी तोंडी तक्रार नोंदविली असून त्यासंदर्भात अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. परंतु आता झांबरे प्रकरण सांभाळणारे अधिकारी नवीन असून त्यांना प्रकरणासंदर्भात काहीही माहिती नाही. परंतु झांबरे पुन्हा सक्रिय झाला असून संपत्ती विकत असल्यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाल्यास सविस्तर चौकशी करण्यात येईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.