यवतमाळ : धुऱ्यावरील गवत जाळण्यासाठी लावलेल्या आगीने शेतात कापणी करून थप्पी मारून ठेवलेल्या गव्हाच्या पिकाला कवेत घेतले. हे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याने शर्थीचे प्रयत्न केले. या धावपळीत शेतकरी भोवळ येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वणी तालुक्यातील उमरी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. महादेव गोविंदा माथनकर (८०, रा. उमरी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
महोदव माथनकर यांनी यावर्षी रब्बी हंगामात गव्हाचे पीक घेतले. गव्हाची कापणी करून त्याची थप्पी मारून शेतातच ठेवली. नवीन हंगामासाठी शेत परत तयार करण्यासाठी त्यांनी धुऱ्यावरील गवत जाळण्यासाठी ते पटवले. ही आग काही वेळातच अनियंत्रित झाली आणि आगीच्या ज्वाळांनी शेतातील गव्हाची थप्पी कवेत घेतली. डोळ्यासमोर गव्हाचे जळत असलेले पीक आगीच्या ज्वाळांपासून वाचवण्यासाठी महादेव यांनी धावपळ सुरू केली. शेतातील मोटारपंप सुरू करून आणि प्लास्टिक कॅनमध्ये पाणी आणून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> आश्चर्य! नामांतर होऊनही समृद्धी महामार्गावर मात्र ‘औरंगाबाद’ नाव कायम
या प्रयत्नात आग आटोक्यात आली. मात्र झालेल्या धावपळीमुळे वयोवृद्ध महादेव माथनकर यांना भोवळ आल्याने ते शेतातच पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी शेतातील बैल घरी आले, मात्र महादेवराव घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शेतात जाऊन बघितले असता त्यांना गव्हाच्या थप्पीजवळ आग लागलेली आढळली व शेजारीच महादेवराव निपचित पडून असल्याचे आढळले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास वणी पोलीस करत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.