गडचिरोली : चालू वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विभागाची सदस्य महिला नक्षल नेता विमला सिडाम उर्फ तारक्का हिने आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर मागील महिन्यात केंद्रीय समिती सदस्य तथा सर्वोच्च महिला नक्षल नेता पोथुला पद्मावती उर्फ सुजाता हिने तेलंगणा येथे शरणागती पत्करली आणि आता भारतातील नक्षलवादी चळवळीचा वैचारिक आणि लष्करी आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ भूपती उर्फ सोनू याने शस्त्र खाली ठेवत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. यातील तारक्का ही भूपतीची पत्नी तर सुजाता ही वहिनी आहे. वर्षभरात एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीतील एका रक्तरंजित अध्यायाचा शेवट झाला आहे.

अर्थशास्त्रात पदवीधर असलेला भूपतीचे मूळ तेलंगणातील पेद्दापल्ली येथील आहे. त्याचा मोठा भाऊ किशनजी हा देखील मोठा नक्षल नेता होता. २०११ साली पश्चिम बंगालमध्ये झालेल्या चकमकीत तो ठार झाला. किशनजीच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळ अधिक आक्रमक करणारा भूपती हा केवळ लष्करी कमांडर नव्हता, तर त्याला संघटनेचा ‘मेंदू’ आणि ‘वैचारिक प्रमुख’ मानले जात. १९८० च्या दशकात त्याने रॅडिकल स्टुडंट्स युनियनमधून नक्षल्यांच्या पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केला.

सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरच्या स्थापनेत त्याची प्रमुख भूमिका होती. आंध्र प्रदेशातील ईस्ट गोदावरी आणि विशाखापट्टणम जिल्ह्यांमध्ये चळवळ रुजवून १९८७ मध्ये त्याने बस्तरच्या जंगलात ‘लिट्टे’च्या माजी सैनिकांकडून विशेष लष्करी प्रशिक्षण घेतले. पुढे महाराष्ट्रातील गडचिरोलीत नक्षल चळवळीचा पाया घालण्यात आणि दंडकारण्य क्षेत्राचे नेतृत्व करण्यात त्याचा मोठा वाटा होता. २००४ मध्ये सीपीआय (माओवादी) पक्षाच्या निर्मितीनंतर त्याला पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या पॉलीट ब्युरो आणि केंद्रीय लष्करी कमांडचे प्रमुखपद देण्यात आले. तब्बल २८ वर्षांहून अधिक काळ तो या पदावर कार्यरत होता. २०१० मध्ये प्रवक्ता आझाद याच्या मृत्युनंतर त्याने ‘अभय’ या नावाने संघटनेचा मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचे मार्गदर्शक म्हणून काम करताना अनेक मोठ्या नक्षलवादी हल्ल्याचा सूत्रधार राहिला आहे.

संघटनेतील सदस्यासोबत बांधली लग्नगाठ

नव्वदच्या दशकात त्याने गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील रहिवासी असलेली सहकारी महिला सदस्य तारक्कासोबत लग्नगाठ बांधली. तारक्काने आजारपणाचे कारण देत यावर्षी एक जानेवारीला आत्मसमर्पण केले. ६२ वर्षीय तारक्का दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य, तसेच दंडकारण्य विभागाच्या मेडिकल टीमची इंचार्ज होती. ३८ वर्षांच्या नक्षल चळवळीतील कारकिर्दीत तिची प्रचंड दहशत होती. ८ नोव्हेंबर २०१० रोजी लाहेरी-मलमपोडूर गावांदरम्यान झालेल्या, १७ पोलिस शहीद झालेल्या चकमकीचे नेतृत्व तिने केले होते आणि त्याचा व्हिडीओही तिनेच व्हायरल केला होता. १३ सप्टेंबररोजी वहिनी सुजाता हिनेदेखील आजारपणाचे कारण देत मुख्य प्रवाह निवडला. चळवळीत असतानाच सुजाताने १९८४ साली किशनजीसोबत लग्न केले. किशनजीच्या मृत्यूनंतर ती अधिक सक्रिय झाली.

२०२२ मध्ये तीला केंद्रीय समितीवर स्थान मिळाले होते. पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांच्या आत्मसमर्पणानंतर भूपतीवर दबाव वाढला होता. सोबतच सुरक्षा दलाच्या आक्रमक कारवायांमुळे नक्षल चळवळ पंकज झाली होती. यातूनच त्याने केंद्र सरकारला सशस्त्र संघर्ष तात्पुरता थांबवून शांततेसाठी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आणि अनेक वर्षांच्या सशस्त्र संघर्षाला त्यांनी सर्वात मोठी चूक मानले. त्याच्या या भूमिकेमुळे नक्षल संघटनेत मोठे वैचारिक मतभेद निर्माण होते. अखेरीस त्याने शस्त्र सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे दंडकारण्याच्या जंगलातील भूपती नावाच्या रहस्याचा, दहशतीचा आणि रक्तरंजित अध्यायाचा शेवट झाला आहे.