अमरावती : अमरावतीहून अंजनगाव येथे जात असलेल्‍या एका कुटुंबाच्‍या कारचा पाठलाग करीत दुसऱ्या कारमधून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी गोळीबार केल्‍याची घटना दर्यापूर येथे गुरूवारी रात्री घडली. या घटनेत युवतीसह तीन जण जखमी झाले आहेत. हल्‍ल्‍याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

अंजनगाव सुर्जी येथील सोळंके कुटुंबीय अमरावतीहून एमएच २६ /डीए ८७२१ क्रमांकाच्‍या कारने दर्यापूरमार्गे अंजनगाव येथे जाण्‍यासाठी निघाले असताना रेवसा फाट्याजवळ त्‍यांची कार नादुरूस्‍त झाली. त्‍यावेळी त्‍यांना पिस्‍तुलातून गोळी सुटल्‍यासारखा आवाज आला. काही जण त्‍यांचा पाठलाग करीत असल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. सोळंके कुटुंबीयांनी ही माहिती ११२ क्रमांकावर पोलिसांना दिली. ते स्‍थळ वलगाव पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत येत असल्‍याने वलगाव पोलिसांनी त्‍यांना संरक्षण देत खोलापूर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीपर्यंत आणून सोडले. त्‍यानंतर खोलापूर पोलिसांच्‍या संरक्षणात या कुटुंबाची कार बोराळा फाट्यापर्यंत आली. मात्र, दर्यापूर पोलिसांनी संरक्षण पुरविण्‍यास उशीर केल्‍याने हल्‍लेखोरांचे फावले.

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये उष्ण लहरी कमी मात्र पावसाळा, अति पाऊस वाढणार, संशोधन संस्थेचा अभ्यास अहवाल

हेही वाचा – टोलमुळे शासनाला महसुलाची ‘समृद्धी’! महामार्गावर ४२२ कोटी ९ लाख रुपये वसूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर्यापूर येथील एका पेट्रोलपंपाजवळ गुंडांनी त्‍यांच्‍याजवळील पिस्‍तुलमधून सोळंके कुटुंबीयांच्‍या कारवर तीन फैरी झाडल्‍या. त्‍यामुळे काच फुटून मागे बसलेल्‍या युवतीच्‍या कानाला गोळी लागली. तर इतर दोघेही जण जखमी झाले. गोळीबार केल्‍यानंतर हल्‍लेखोर त्‍यांच्‍या कारमधून पसार झाले. सोळंके कुटुंबीयांनी एका आरोपीवर संशय व्‍यक्‍त केला असून पोलिसांनी हल्‍लेखोरांचा शोध सुरू केला आहे.