वर्धा : सत्तेत आल्यावर विरोधकांना नामोहरण करण्याची बाब राजकारणात नवी नाही. निवडून आल्यावर चारच महिन्यात नॉट रिचेबलचा टॅग लागलेल्या खासदार अमर काळे यांच्या ताब्यातील संस्था आता वक्रदृष्टीत आल्याचे दिसून येते. आष्टी बाजार समितीची उपशाखा म्हणून कारंजा बाजार समिती अस्तित्वात आली. त्यावर खासदार अमर काळे गटाचे वर्चस्व होते. आता कारंजा बाजार समिती बरखास्त करीत ही स्वतंत्र बाजार समिती म्हणून अस्तित्वात आली आहे.

आष्टी व कारंजा या दोन स्वतंत्र बाजार समित्या असाव्या, असा भाजपचा सातत्याने प्रयत्न सूरू होता. तत्कालीन आमदार दादाराव केचे यांनी विधिमंडळात पण दोन स्वतंत्र बाजार समित्या कराव्या, अशी मागणी लावून धरली होती. अखेर आता त्यास यश आले आहे. कारंजा उपबाजार समितीत खासदार काळे गटाचे सभापतीसह १४ तर भाजपचे ३ संचालक होते. हे संचालक मंडळ बरखास्त करीत जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक नियुक्ती केली. आता कारंजा व आष्टी या दोन स्वतंत्र बाजार समित्या म्हणून कार्यरत होणार असून सध्या आष्टीत गौतम धोंगडी तर कारंजा बाजार समितीवर संदीप भारती यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोनच वर्षात संचालक मंडळ बरखास्त झाले. १५ दिवसापूर्वीच खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. केवळ कारंजा बाजार समितीतच सत्ता होती. ती सुद्धा आता गमवावी लागली असल्याने काळे गटास दुसरा धक्का बसला आहे.

हेही वाचा…गवंड्याच्या प्रेमात पडली दहावीची विद्यार्थिनी, पळून जाऊन लग्न केले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता आष्टी बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे १५८ गावांचे तर कारंजा बाजार समितीचे कार्यक्षेत्र १२१ गावापुरते मर्यादित राहणार. आष्टीत दोन व कारंज्यात तीन कर्मचारी नियुक्त होणार असल्याचे बरखास्ती आदेशात नमूद आहे. आता आष्टी व कारंजा येथे प्रशासक तर आर्वी बाजार समितीवर भाजपचा झेंडा आहे. त्यामुळे आर्वी मतदारसंघातील सहकार क्षेत्र भाजपच्या ताब्यात गेल्याचे म्हटल्या जाते. आष्टी व कारंजा या दोन स्वतंत्र बाजार समित्या झाल्याने असलेल्या ठेवी व रोख समान विभागल्या जाणार. तसेच मालमत्तेचे सुद्धा समान विभाजन केल्या जाणार आहे.
आर्वी परिसरात काळे विरुद्ध भाजप असा नेहमी राजकीय संघर्ष राहला आहे. येथील दादासाहेब काळे यांनी स्थापन केलेला सहकार गट त्यांचे नातू संदीप काळे हे सध्या चालवितात. ते अमर काळे विरोधक म्हणून भाजप सोबत जुळले आहे. आता खासदार गटाचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी भाजप व सहकार गट एकत्रित आले आहे.