अमरावती : साहित्य संमेलनापासून ते विविध समाजांच्या संमेलनाचे आयोजन आजवर होत आले आहे, पण अमरावतीत आता चक्क मद्यपींचे संमेलन भरणार आहे. या संमेलनात मद्याचे व्‍यसन जडलेले आणि त्‍या विळख्‍यातून बाहेर पडलेले लोक आपल्‍या अनुभवांचे कथन करणार आहेत. शनिवारी १० जून रोजी शहरातील नवाथे रेल्वे क्रॉसिंग परिसरातील साईकृष्ण मंगल कार्यालयात हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

मौजेखातर प्राशन केलेले मद्य, कालांतराने व्यसन होते. व्यक्तीने व्यसनावर नियंत्रण न ठेवल्यास कुटुंबावरच संकट कोसळते. मद्याच्या या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहे. या जीवघेण्या विळख्यात सापडलेल्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ ही संस्था संकटमोचकाचे कार्य करीत आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थेची शाखा अमरावतीतही आहे. अतिमद्य सेवन हा एक आजार आहे. अशा आजारातून व्यक्तीला बरे करण्यासाठी कुणा औषधाची नव्हे तर मानसिकता बदलण्याची गरज असते. याच विचारातून या स्‍वयंसेवी संस्‍थेची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

हेही वाचा – भाजपाचे पुन्हा मिशन-४५; केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव आजपासून बुलढाणा जिल्ह्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दारूमुळे अनेक कुटुंबांची परवड होताना दिसते. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावते. शिवाय आरोग्यविषयक समस्यादेखील उद्भवतात. केवळ मद्यपीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ बसते. मद्यपानाच्या अतिरेकामुळे कौटुंबिक वाददेखील निर्माण होतात. अशा स्थितीत ‘अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस’ या संस्थेच्या पुढाकारातून शहरातील जवळपास दोनशे नागरिक स्वतःला आलेले वाईट अनुभव दुसऱ्यांना येऊ नये या हेतूने जनजागृतीचे कार्य करीत आहेत. मद्यपानापासून मुक्तता मिळवलेल्या लोकांमध्ये अनेक डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते आणि सर्वसामान्‍य नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व लोक या संमेलनाच्या माध्यमातून त्यांना स्वतः आलेले अनुभव कथन करून दुसऱ्यांना मद्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत.