भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींच्या खंडणीची मागणी करून बॉम्बस्फोटने उडवण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथा ऊर्फ शाहिदने नागपूर पोलिसांना चक्रावून सोडले आहे. ‘आरोप करण्यापूर्वी स्मार्टफोन शोधा आणि सीमकार्ड पण दाखवा’, अशी भूमिका घेत त्याने पोलिसांना भंडावून सोडले आहे.

हेही वाचा- नागपुरात काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा; शिक्षक मतदार संघ निवडणूक

गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी जयेश कांथा याने थेट दाऊदचे नाव घेऊन फोन केला. गडकरींनी १०० कोटी रुपयांची खंडणी द्यावी अन्यथा भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आणि गडकरी यांच्या घरी बॉम्बस्फोट करू, अशी धमकी दिली. त्यामुळे नागपूर पोलिसांनी तत्परता दाखवून सायबर क्राईमच्या मदतीने जयेश कांथाचा शोध लावला. तो बेळगावातील कारागृहात फाशीची शिक्षा झालेला कैदी असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा- ‘एसीबी’ने गुवाहाटीच्‍या विमान प्रवासाची चौकशी करावी!; आमदार नितीन देशमुख यांचा टोला, म्हणाले “उपमुख्यमंत्र्यांचे कारस्थान…”

गुन्हे शाखेचे एक पथक बेळगाव कारागृहात दाखल झाले आणि त्यांनी लगेच जयेश कांथा याच्या बॅरेकची झाडाझडती घेतली व तेथून एक डायरी जप्त केली. गुन्हे शाखेने सोमवारी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. बेळगाव कारागृहातच त्याची चौकशी सुरू केली. जयेशने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत नागपूर पोलिसांना त्रस्त करून सोडले. ‘मी ज्या स्मार्टफोनवरून कॉल केला तो फोन दाखवा किंवा ज्या सीमकार्डवरून कॉल केला, ते सीमकार्ड दाखवा’, असे प्रतिप्रश्न जयेश पोलिसांना विचारत आहे. त्यामुळे पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. जयेश हा पोलिसांना सहकार्य करीत नसून फोन केल्याबाबतही नकार देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा- “संजय राऊतांचा मला फोन आला आणि त्यांनी…”, आमदार कपिल पाटलांनी सांगितला उमेदवार माघारीचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी, जयेश कांथाने काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून खबऱ्या असल्याचे सांगून अनेकदा त्रस्त करून सोडल्याचे समोर आले आहे. तसेच, कर्नाटकच्या एका पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला कारागृहातून फोन करून दमदाटी केली होती. त्या प्रकरणात जयेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडकरींना धमकी दिल्यामुळे बेळगाव कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. दरम्यान, नागपूर पोलीस जयेशला नागपुरात आणण्यासाठी प्रक्रिया करीत असल्याची माहिती आहे.
.