पर्यावरणाचे दाखले देत प्रत्येकाने आपापल्या परीने गणेश विसर्जनाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जेवढी प्रसिद्धी झोळीत भरता येईल तेवढी भरून घेतली. यात प्रसंगांपुरताच दिसणाऱ्या पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांपासून तर राजकारण्यांपर्यंत साऱ्यांचाच सहभाग होता. गणेश विसर्जनानंतर या सर्वानी तलावाची स्वच्छता मोहीम राबवली, पण तलावाच्या संरक्षणाचे काय, या प्रश्नाचे उत्तर एकालाही देता आले नाही. मोठय़ा प्रमाणात गणेशमूर्तीचे विसर्जन झालेला फुटाळा तलाव अर्धाअधिक जलपर्णी वनस्पतींने व्यापला असताना गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळातील निर्माल्याने त्याला विळखा घातला. त्यामुळे या स्वच्छता अभियानापेक्षाही तलावांच्या संरक्षणाची मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

शहरातील इतर तलावांच्या तुलनेत फुटाळा तलावात पाणी भरपूर असले तरीही प्राणवायू आणि स्वच्छतेच्या बाबतीतही तो अग्रेसर आहे. फुटाळ्याची चौपाटी डोळे दिपवणारी आहे, पण चौपाटीच्या विरुद्ध दिशेकडून जलपर्णी वनस्पतींचा चौपाटीकडे वाढणारा ओघ तलावाचे आयुष्य कमी करत आहे. यापूर्वीही जलपर्णी वनस्पतींने शहरातील नाईक तलाव, लेंडी तलाव संपवले आहेत, त्यामुळे महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने जलपर्णीचे गांभीर्य लक्षात घेतले नाही, तर फुटाळासुद्धा याच मार्गाने जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवात सुरुवातीचे नऊ दिवस नाही, पण अखेरच्या दिवशी मात्र मोठय़ा प्रमाणात निर्माल्याचा ओघ तलावात गेला. फुलांच्या माळांसह गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या, तर काहींनी सोबत आणलेले निर्माल्य तलावात स्वाहा केले.

त्यामुळे निर्माल्याचा थर या तलावावर होता. त्यानंतर काही राजकारण्यांसह अनेक स्वयंसेवी संघटना विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तलावाच्या स्वच्छतेसाठी धावून आल्या. तलावाच्या काठावरील पीओपींच्या गणेशमूर्ती आणि निर्माल्य त्यांनी बाहेर काढले. मात्र, त्यांची ही कृती तलावाचे प्रदूषण कमी करणारी असली तरी प्रदूषण थांबवू शकली नाही.

मुळातच तलावात वेगाने वाढणाऱ्या जलपर्णी वनस्पतींची सफाई करणे आधी गरजेचे होते. त्यासाठी पर्यावरण, तसेच जलतज्ज्ञांनीही अनेकदा प्रशासनाला सांगितले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे अर्धाअधिक तलावावर जलपर्णी वनस्पतींनी आक्रमण केले आहे.

गणेश विसर्जनानंतर तलाव परिसर स्वच्छता अभियान राबवण्याचा प्रयोग सर्वानी केला, पण त्याआधीच या जलपर्णी वनस्पतींवर अध्रेअधिक निर्माल्य जाऊन अडकले आहे. स्वयंसेवी आणि राजकारणी हे स्वच्छतेपुरतेच मर्यादित आहेत, तलावाच्या खोलवर जाऊन जलपर्णी वनस्पतींचा सफाया करणे हे त्यांचाही हातात नाही.

तलावाचे संरक्षण महत्वाचे -कौस्तुभ चटर्जी

गणेश विसर्जनानंतरच्या स्वच्छता अभियानाने तलावाचे संरक्षण होणार नाही, कारण खोलवर जाऊन तलावाची स्वच्छता करण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. त्यासाठी महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने निविदा काढून तलावातील जलपर्णी वनस्पती काढणार्या संस्थेला नियुक्त करणे गरजेचे आहे. स्वच्छता मोहीमा केवळ तलावांची स्वच्छता करतील, पण तलावाचे संरक्षण करायचे असेल, तर प्रशासनालाच समोर येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ग्रीन विजिलचे कौस्तुभ चटर्जी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी आधी भाजप कार्यकर्ते सरसावले

अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीने फुटाळा तलावावर स्वच्छता मोहीम राबवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ते स्वच्छता अभियानासाठी पोहोचलेही. मात्र, त्याचवेळी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ऐनवेळी स्वच्छता मोहीम हाती घेतली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचण्याआधीच भाजपचे कार्यकर्ते स्वच्छता अभियानासाठी पोहोचल्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांत वादावादी झाली. त्यामुळे हे स्वच्छता अभियान म्हणजे, स्वच्छता कमी आणि प्रसिद्धीचा हव्यास अधिक असल्याचे स्पष्ट झाले.