महापालिकेच्या वृक्षगणनेतील वास्तव; रक्तकांचन, पांढरा गुलमोहर केवळ नावालाच

उपराजधानीची ओळख तशी संत्रानगरी. पण, याच उपराजधानीत काटेरी बाभळींची झाडे अधिक आहेत, असे सांगितले तर! वाचून आश्चर्य वाटेल. पण, हेच वास्तव आहे. २०११ मध्ये या शहरात जीपीएस तंत्रज्ञान वापरून आणि वैज्ञानिक पद्धतीने झाडांची गणना झाली. त्यावेळी शहरातील एकूण २१लाख ४३ हजार८९८ इतकी झाडे मोजण्यात आली. त्यापैकी तब्बल ३.१८ लाख झाडे केवळ बाभळीची आढळली. विशेष म्हणजे, फणस, पेवंदी बोर, रक्तकांचन, पांढरा गुलमोहर यासारख्या सुंदर दिसणाऱ्या झाडांची प्रत्येकी एक अशी नोंद आहे.

शहरातील वृक्षांची प्रत्येक पाच वर्षांनी गणना व्हावी असा निकष आहे. त्यानुसार २०११ मध्ये महापालिकेने वृक्षगणना केली. ही शहरातील पहिलीच गणना होती. या गणनेत सर्व अत्याधुनिक आणि तांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात आला. या गणनेनंतर समोर आलेल्या आकडेवारीने सर्वानाच कोडय़ात टाकले. कारण या शहरात काटेरी झाडांची संख्याच अधिक आढळून आली. त्यापाठोपाठ, सुबाभूळ, बोर, कडूनिंब, गुलमोहर ही झाडे आहेत. या वृक्षगणनेनुसार बाभळीची संख्या अधिक दिसून येत असली तरीही शहराच्या मध्यवर्ती भागात ती नाही. गेल्या एक दशकात शहर बरेच विस्तारले. दाभा, चिंचभवन, मनीषनगर, बेसा-बेलतरोडी यासारख्या नवीन सीमावर्ती भागात झपाटय़ाने नागरिकीकरण झाले. या भागात पूर्वी झुडपी जंगल होते आणि त्याठिकाणी बाभळीची झाडे देखील मोठय़ा प्रमाणावर होती. शिवाय ही झाडे वेगाने वाढत असल्याने मोठय़ा प्रमाणावर झुडपी जंगल तयार होत गेले.

आता मात्र हे जंगल तोडले जात आहेत आणि त्याठिकाणी सिमेंटच्या इमारती तयार होत आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील विकास कामे आणि त्यासाठी तोडली जाणारी झाडे पाहता त्यांची संख्या सुद्धा कमी झालेली दिसून येईल. निकषानुसार, २०१७ मध्ये वृक्षगणना होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनपर्यंत याविषयी पालिकेत काहीच हालचाल नाही. मुंबई, पुणे या शहरात देखील आठ, नऊ वर्षांच्या कालावधीनंतर दुसरी, तिसरी वृक्षगणना होत आहे. हिरवळीच्या बाबतीत नागपूर शहर देशात चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चंदीगड तर दुसऱ्या क्रमांकावर गांधीनगर आहे. चंदीगडशी नागपूरची तुलना करता येणार नाही, पण दुसऱ्या क्रमांकावरील गांधीनगरशी तुलना केली तर नागपूरपेक्षा ते तब्बल ११ लाखांनी समोर आहे. पहिल्या वृक्षगणनेनंतर शहरात खऱ्या अर्थाने विकास कामांची गती वाढली. यात अनेक झाडांचा बळी गेला. त्यामुळे कधीकाळी दुसऱ्या क्रमांकावर असणारे हे शहर आपली जागा परत मिळवणार की विकासकामात तोडल्या जाणाऱ्या झाडांमुळे क्रमांक आणखी खाली येणार, हे यानंतर होणाऱ्या वृक्षगणनेअंतीच कळणार आहे.

जैवविविधता नोंदवही तयार नाही

जैवविविधता मंडळ तयार झाल्यानंतर महापालिकेने जैवविविधता नोंदवही करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, बहुतांश महापालिकेत ही नोंदवही अजूनपर्यंत तयार नाही. वृक्षगणना आणि नोंदवही एकाचवेळी केली तर दोन्ही कामे एकाचवेळी होतील आणि खर्चही कमी होईल.

– सुधीर माटे, सेवानिवृत्त उद्यान अधीक्षक, महापालिका नागपूर