भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारूही शकतो’, असे वक्तव्य करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. नंतर त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत एका ‘गावगुंड मोदी’ला सर्वांसमोर आणले. आता तेच गावगुंड मोदी पटोलेंच्या कार्यक्रमात मंचावर अवतरल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यांना नानांनीच निमंत्रण दिले की काय? याबाबत तर्क लावले जात आहे.

हेही वाचा >>> पनवेल : कामावरून घरी परतत असलेल्या महिलेचा स्थानकाजवळ खून

लाखांदूर तालुक्यातील एका कार्यक्रमात गुरुवारी ‘ते’ गावगुंड मोदी ऊर्फ उमेश घरडे आणि पटोले एकाच मंचावर आले. नानांच्या त्या वक्तव्यनंतर भाजपने त्यांच्या विरोधात रान उठवले होते. त्याच्या काही दिवसांनंतर ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नव्हे, तर गावगुंड मोदीबाबत बोललो होतो’, असे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले होते. काही दिवसांनंतर ॲड. सतीश उके यांनी गावगुंड मोदीला नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकारांसमोर आणले. त्यानंतर कुठे हा विषय थंडबस्त्यात गेला आणि गावगुंड मोदी अचानक विजनवासात गेले. पण, गुरुवारी तेच मोदी पटोलेंच्या कार्यक्रमात मंचावर अवतरले. यामुळे सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या. ज्याला मारण्याच्या बाता पटोले करीत होते, त्याला पटोलेंनीच निमंत्रण दिले की काय, याबाबत जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : घरा बाहेर जाताय…गाडी कुठे पार्क करणार? घरघर चालते डोक्यात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पटोले यांनी आपण गावगुंड मोदीला निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्टीकरण यावर दिले आहे. मात्र, आपण नाना पटोले यांनाच भेटण्यासाठी गेलो होतो, असे घरडे यांनी माध्यमांना सांगितले. दोघांनीही आपापली बाजू मांडली असली तरी गुरुवारच्या या कार्यक्रमामुळे ‘त्या’ बहुचर्चित जुन्या प्रसंगाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.