नागपूर : प्रदूषणकारी वातावरण दूर करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून आता ‘सक्र्युलर इकानॉमी पार्क’ तयार करण्याची योजना आहे. या माध्यमातून सगळय़ा प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून संपत्ती निर्माण करायची आणि सोबतच प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपुरातील भांडेवाडी येथे एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते. प्रदूषणामुळे कुठे अवकाळी पाऊस तर कुठे दुष्काळी स्थिती निर्माण होते. हे प्रदूषण केवळ उद्योगांमुळे होत नाहीतर त्यात शहरांचा देखील मोठा सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत योजना हातात घेतली आहे. त्यामुळे शहर शाश्वत होत आहेत. नागपुरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ‘सक्र्युलर इकानॉमी’चे उत्तम उदाहरण आहे. कचऱ्यापासून बायोगॅस, खत निर्माण होणार आहे. कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>मंदिरातून शोभायात्रा पाहून परत जाताना बेदम मारहाण, दलित युवकाचा मृत्यू; रामटेक गडमंदिर मार्गावरील घटनेने खळबळ

नागपूर शहराच्या विकासाबाबत ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत नागपूरचा सर्वागीण विकास होत आहे. या शहराचे रूपडे बदलत आहे. पण, एका गोष्टीची खंत होती. अनेक प्रयोग केल्यावर घनकचऱ्याबाबत समाधानकारक उपाय होऊ शकले नव्हते. याच कारणाने नागपूर शहराला स्वच्छ भारत योजनेत खालचे नामांकन येत आहे. या प्रकल्पाने आता ही कमरता दूर होणार आहे. देशातील नागपूर हे शाश्वत शहर असणार आहे, असेही ते म्हणाले.