लोकसत्ता टीम

वाशीम: जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. गुढीपाडवा तोंडावर आला आहे. मात्र अद्याप जिल्ह्यात शिधा पोहचलाच नसून शिधावाटप प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, गुढीपाडव्याच्या तोंडावर शासकीय, निमशासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या आधी सरकारने जनतेची दिवाळी गोड करण्याची घोषणा केली होती. परंतु तेव्हाही अनेक लाभार्थ्यांना दिवाळी उलटून गेल्यानंतरदेखील शिधा मिळाला नव्हता. अशीच स्थिती आता संपामुळे निर्माण झाली आहे. १४ मार्चपासून जिल्ह्यातील जवळपास १७ हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. आता गुढीपाडवा तोंडावर आलेला आहे. परंतु अद्याप जिल्ह्यातील कोणत्याच रेशन दुकानावर शिधा पोहोचलेला नाही. कोणत्याच रेशन दुकानदारांकडून चलानदेखील भरून घेतलेले नसल्याने ‘आनंदाचा शिधा’ वाटप प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा- जुन्या पेन्शनसाठी अमरावतीत हजारो कर्मचाऱ्यांचे वादळ; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जे कर्मचारी संपावर गेले नाहीत, त्यांच्याकडून प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांना वेळेत शिधा मिळावा, यासाठी आधीच सरकारकडे मागणी केली आहे. त्यामुळे शिधा दाखल होताच वितरीत करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांनी सांगितले.