लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकासह अन्य निवडणुका आल्या की राजकीय पक्षांच्या सभा शहरातील कस्तुरचंद पार्क, यशवंत स्टेडियम किंवा अन्य काही ठराविक मोठ्या मैदानावर घेतल्या जात होत्या. आता मात्र ही मोठी मैदाने राजकीय सभांना देणे बंद केले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना मोठ्या सभा घेण्यासाठी मैदान नसून अडचण निर्माण झाली आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी महाविकास आघाडीची सभा येत्या १६ एप्रिलला पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी परिसरातील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. हे मैदान क्रीडा क्षेत्रासाठी राखीव असल्याचे कारण देत भाजपने या मैदानाला विरोध केला. यामुळे शहरातील मोठ्या मैदानाचा विषय चर्चेला आला आहे. शहरात मैदाने अनेक आहेत. पण शहरातील सर्वात मोठे आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले मैदान म्हणून कस्तुरचंद पार्कची वेगळी ओळख आहे. देशातील अनेक दिग्गजांच्या जाहीर सभा या मैदानावर झाल्या आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मायावती, राज ठाकरे अशा अनेकांच्या सभा या मैदानाने पाहिल्या आहेत.कस्तुरचंद पार्क किती भरले, यावरून सभेच्या यशापयशाचा अंदाज बांधला जायचा. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय आणि हेरिटेज संवर्धन समितीच्यावतीने कस्तुरचंद पार्कचा विकास करण्यात येणार असल्यामुळे राजकीय सभांना कस्तुरचंद पार्क देणे बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>अवकाळी पावसाच्‍या नुकसान भरपाईपोटी अमरावती जिल्ह्याला २.३८ कोटींची मदत; थेट खात्यात जमा होणार रक्कम

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या सभेनंतर राजकीय सभांना कस्तुरचंद पार्क देणे बंद करण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या यशवंत स्टेडियम फुटबॉलसह अन्य खेळासाठी राखीव आहे. तरीही या ठिकाणी गेल्या काही वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या मैदानाचा उपयोग केला असला तरी राजकीय सभासाठी मैदान दिले जात असल्याचे महापालिकेककडून सांगण्यात आले. फुटबॉलचे मैदान म्हणून या स्टेडियमची ओळख आहे. याशिवाय रेशीमबाग मैदान, गाडीखाना मैदान, लक्ष्मीनगर मैदान, मानेवाडातील नाथ साईनगर मैदान, गरोबा मैदान, इंदोरा मैदान, यंग मुस्लीम फुटबॉल मैदान, दयानंदनगर उद्यान, वर्धमाननगरातील कच्छी ओसवाल मैदान, हिवरीनगर, पारडी मैदान, दर्शन कॉलनी मैदान, नंदनवन मैदान, टिळकनगर मैदानाशिवाय धनवटे नॅशनल कॉलेज, मेकोसोबाद मेथेडिस्ट उच्च माध्यमिक शाळेचे मैदान, कुर्वेज न्यू मॉडेल, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे दीक्षाभूमी येथील मैदान, वसंतनगर मैदान, महाराजबागजवळील फुटबॉल मैदान ही शैक्षणिक आणि खाजगी संस्थाची मैदाने आहेत. मात्र, यातील बहुतेक मैदाने ही क्रीडा क्षेत्रासाठी राखीव असल्यामुळे ती राडकीय सभांसाठी देता येत नाही.निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षाच्या सभा प्रत्येक विधानसभा निहाय त्या त्या मैदानातील मोकळ्या मैदानात होत असल्या तरी या मैदानावर दोन ते पाच हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था आहे. मात्र, सभेसाठी लाखांच्या संख्येत येणाऱ्या लोकांसाठी आता शहरात मोठी मैदाने राहिलेली नाही. त्यामुळे ही सर्वच राजकीय पक्षासमोर अडचणी निर्माण करणारी बाब ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कस्तुरचंद पार्कचा समावेश ‘हेरिटेज’मध्ये करण्यात आल्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राजकीय सभांना हे मैदान देता येत नाही. या मैदानाचे सर्वधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. शहरातील अनेक मैदाने ही क्रीडा क्षेत्रासाठी राखीव असल्यामुळे आणि त्या दृष्टीने विकसित केली जात आहे. त्यामुळे तिथे राजकीय सभा घेता येत नाही.- प्रमोद गावंडे, हेरिटेज संवर्धन समिती सदस्य