नागपूर : एसटीच्या नागपूर विभागातील आठही आगारांत डिझेलची टंचाई सुरू आहे. त्यामुळे गाड्या उशिरा सोडणे वा काही प्रसंगी फेऱ्या रद्द करण्याची पाळी महामंडळावर येत आहे. आर्थिक अडचणीतून हा प्रकार सुरू असला तरी विभाग नियंत्रक येथील आगार व्यवस्थापक वेळीच मागणी नोंदवली नासल्याने सुरवातीला थोडी अडचण आली, पण आता स्थिती सामान्य असल्याचा दावा करत आहे.

नागपुरातील गणेशपेठ आगारात डिझेल तुटवडा झाल्यावर बुधवारी संध्याकाळी येथील बस इतर आगारात पाठवल्या गेल्या. घाट रोड आगारातही समस्या होती. गणेशपेठ आगारात रात्री टँकर आल्याने दिलासा मिळाला, पण हे १२ हजार लिटर डिझेल दोन दिवसच पुरणार आहे. त्यानंतर पुन्हा तुटवड्याचा धोका आहे.

हेही वाचा – अकोला : खावटी बंद करण्यासाठी चक्क न्यायाधीशांच्या बनावट स्वाक्षरीचे बनवले दस्तऐवज; पुढे झाले असे की…

बुधवारी इमामवाडा आगाराचा पंप बंद असल्याने ते घाट रोडवरूनच इंधन भरत होते. मात्र, दोन्ही आगाराची स्थिती डिझेलअभावी चिंताजनक होती. गणेशपेठ आणि इतर काही आगरात गेल्या काही दिवसांत इंधनअभावी काही फेऱ्या रद्द झाल्या. पण प्रवासी नसल्याचा दावा करत फेरी रद्द झाल्याचे अधिकारी सांगतात. या प्रकाराने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेही वाचा – गृहमंत्री शहा संसदेत खोटे बोलले, संसदेत नामोल्लेख झालेल्या कलावतीबाईचा काय आहे दावा?

विभाग नियंत्रक घुले म्हणाले, नागपूर विभागाला रोज सुमारे २६ हजार लिटर डिझेल लागते. संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून मागणीनुसार पुरवठा होतो. आगार व्यवस्थापकाने वेळीच मागणी व पाठपुरावा न केल्यास अडचण येते. तूर्तास काही समस्या नसून एसटीचे संचालन सुरळीत आहे.