नागपूर : नागपुरातील भांडेवाडी क्षेपणभूमीत आग लागल्याने जळालेल्या प्लास्टिकच्या धुराने क्षेपणभूमीच्या शेजारील लोकवस्तीचा श्वास कोंडला. भांडेवाडी येथे कचऱ्याचे मोठे डोंगर तयार झाले आहेत. त्यांनाच ही आग लागली. या आगीनंतर सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाभोवती लोकवस्ती आहे. पवन शक्ती नगर, सुरजा नगर, संघर्ष नगर, अबुमिया नगर आणि तुलसी नगर येथील रहिवाशांना श्वास घेणे कठीण झाले. या वस्तीतील लोकांच्या घरात प्लॉस्टिकच्या धुरामुळे गॅस चेम्बरसारखे वातावण निर्माण झाले होते.

शेजारच्या वस्त्यांमध्ये या आगीमुळे दहशत पसरली. आगीची माहिती मिळताच, लकडगंज, वाठोडा, कळमना, सक्करधारा, त्रिमूर्ती नगर, सिव्हिल लाईन्स आणि सुगत नगर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीचे नेमके कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. मात्र, वाढलेल्या तापमानामुळे आणि कचऱ्यातील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने रौद्र रूप धारण केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी लागलेली आज सकाळी काही ढीगाऱ्यात धुमसत होती. महापालिकेने काल रात्री काही वस्त्यांमधील नागरिकांना शाळांमध्ये स्थानांतरित केले होते.

वाढलेल्या तापमानामुळे आणि कचऱ्यातील ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग मोठी झाल्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे याठिकाणी कचरा साठून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी आणि ज्वलनशील वायू तयार होतात. आज तापमानाचा पारा चांगलाच चढला असताना वायू त्याच्या संपर्कात आल्यानेही ही आग लागली असावी, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या भीतीमुळे लोक परिसरातील लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाने नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजार आणखी बळावणार?

भांडेवाडी परिसरात गरीब नागरिक वस्त्या करून राहतात. आगीमुळे कचऱ्यातील मिथेन वायू, धूळ, धुलीकणामुळे येथील नागरिकांचे जीवनमान अत्यंत गंभीर झाले आहे. त्यांना श्वसनाचे, फुफ्फुसाचे आजार जडले आहेत. या आगीच्या धुरामुळे ते आजार आणखी बळावण्याची भीती व्यक्त करीत स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे तक्रार केली.