बुलढाणा : पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना थोपविण्यासाठी चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना आज संध्याकाळी मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात घडली. यानंतर तिघे चोरटे फरार होण्यात यशस्वी ठरले. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. उलट सुलट चर्चांनाही उधाण आले.

हेही वाचा >>> नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले

मलकापूर येथील रेल्वे स्थानकातून चोरट्यांनी पळ काढत जवळच असलेल्या रामवाडीत हवेत गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झाला नसून मलकापूर पोलीस फरार चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज संध्याकाळी फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गंगासागर एक्सप्रेस आली होती. त्यातील प्रवाशाच्या मोबाईल चोरीच्या प्रयत्नात हे तिघेजण होते. तीन चोरट्यांचा प्रयत्न फसल्यानंतर  नागरिकांकडून त्यांना पकडण्याचा प्रयत्न झाला. त्या चोरट्यांनी पळ काढला. यावेळी नागरिक मागे येत असल्याचे पाहून तिघांपैकी एका चोरट्याने आपल्या जवळील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. फलाटावर आधीपासूनच बसून असलेल्या ‘त्या’ तिघांनी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

हा प्रकार तेथे असलेल्या प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करीत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान रेल्वे आरपीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तिघे तेथून पळ काढून रेल्वेच्या कुंपण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी परिसरातून पळत सुटले. यावेळी काही नागरिक त्यांचा पाठलाग करत धावत निघाले. नागरिक आपल्याला पकडतात की काय, या भीतीपोटी त्या तिघांपैकी एकाने त्याच्या जवळील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला. यानंतर नांदुरा रोडवर ऑटो रिक्षामध्ये बसून ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवई यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करीत आहेत.