लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत जीबीएसचे रुग्णासह मृत्यू वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. शहरातील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) जीबीएसचा तिसरा मृत्यू नोंदवण्यात आला. दरम्यान मेडिकलमध्ये या आजाराचे बरेच रुग्ण दाखल असून या आजाराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) मृत्यूसंख्या वाढत आहे. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू असलेल्या एका ३२ वर्षीय रुग्णाचा या आजाराने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागपुरातील विविध रुग्णालयात या आजाराने दगावलेल्या रुग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे. दरम्यान दगावलेला रुग्ण हा मध्यप्रदेशचा आहे.

मध्य प्रदेशला प्रकृती खालावल्यावर त्याला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले होते. तो अनेक दिवसांपासून जीवनरक्षण प्रणालीवर होता. शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरातील विविध रुग्णालयात या आजाराने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. तर नागपुरात हळूहळू हे रुग्ण वाढताना दिसत असून आजपर्यंत या आजाराचे तब्बल २१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मेडिकलमध्ये एक साडेसात वर्षांचा मुलगा व एक वयस्क असे दोन रुग्ण अत्यवस्थ आहेत.

नागपूर जिल्ह्यातील रुग्णालयांत रुग्ण किती?

नागपूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मेडिकलमध्ये नोंदवले गेले. मेडिकलमध्ये आजपर्यंत या आजाराच्या आढळलेल्या जीबीएस रुग्णांची संख्या १२ आहे, हे विशेष. दरम्यान नागपुरातील विविध रुग्णालयात आढळलेल्या रुग्णांपैकी नऊहून जास्त रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. मेडिकलमधून एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी इतर रुग्णालयात हलवले. तर चार रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?

गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा विकार आहे; ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती परिधीय मज्जासंस्थेवर हल्ला करते. या स्थितीमुळे अशक्तपणा, सुन्नपणा आणि गंभीर प्रकरणांमध्ये पक्षाघात होऊ शकतो. गुइलेन बॅरे सिंड्रोम कोणालाही प्रभावित करू शकतो. मात्र त्याचे नेमके कारण समजलेले नाही. या आजारातून बरे होण्यासाठी प्रत्येक रुग्णाला वेगववेगळा वेळ लागू शकतो. बहुतेक व्यक्ती काही आठवड्यांत बरे होतात; तर काहींना महिनाभराचा कालावधी लागतो. या आजाराची लागण झालेले सुमारे ८० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात, १५ टक्के रुग्णांमध्ये काही काळ अशक्तपणा असू शकतो व पाच टक्के रुग्णांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. या विकारावर लवकरात लवर उपचार घेणे गरजेचे असते.