विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्याअगोदर भाजपाच्या आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

फडणवीस म्हणाले, “मागील २५ वर्षे सातत्याने जेव्हा जेव्हा नागपुरात अधिवेशन होतं, आम्ही भाजपाचे सर्व आमदार हे या ठिाकणी स्मृतिस्थळावर येतो. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी यांच्या समाधींचं दर्शन घेतो आणि एक परिचयात्मक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होतो. यंदाही दोन वर्षांच्या खंडानंतर आम्ही या ठिकाणी आलो, कारण दोन वर्ष या ठिकाणी अधिवेशनच झालं नाही. सगळ्यांमध्ये या ठिकाणी येण्याची एक उत्कंठा होती. कारण, आमच्या सगळ्यांसाठी ही प्ररेणाभूमी आहे. ज्या राष्ट्रीयतेच्या विचारातून आम्ही देशात किंवा विविध क्षेत्रात काम करतो, त्या विचाराचा जन्म ज्या ठिकाणी झाला आणि त्याचे जे उर्जा पुरुष आहेत त्यांच्याकडून ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय या ठिकाणी भाजपाच्या सर्व आमदारांना भविष्यतला भारत हे पुस्तकही भेट देण्यात आलं. याबाबत फडणवीसांनी सांगितलं की, “भविष्यातला भारत हे जे पुस्तक आहे, आपल्याला कल्पना आहे की मागील वर्षी सरसंघचालक मोहन भागवत यांचं तीन दिवसीय भाषण दिल्लीत झालं होतं आणि ते अतिशय गाजलं होतं. ज्यामध्ये भविष्यातला भारत कसा असावा, या संदर्भात अतिशय उत्तम आणि अतिशय विकासात्मक अशाप्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. त्याचंच पुस्तक रुपांतर करण्यात आलेलं आहे आणि आज ते सर्वांना देण्यात आलेलं आहे.”