वर्धा : पावसाने घर पडले. संसार उघड्यावर व कुटुंब स्नानगृहात. मदतीची वाट बघत थकले. अखेर प्रशासनास जाग आली. मायलेकास ग्रामपंचायतची ओसरी मिळाली आणि आता इतरही मदत लागू होणार. पण अडचणी आहेच. हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ येथील काहीसे मतिमंद असलेल्या वृद्ध आई व मुलाची ही कथा.

गावातच राहून मिळेल ते काम करीत स्वतःचे व आईचे पोट भरीत जीवन जगणाऱ्या श्रीराम डंभारे यांची आपत्ती मन पिळवटून टाकणारी. सततच्या पावसात घर कोसळले. दुसरीकडे जायची सोय नाही. मतिमंद असल्याने गावातून मदत मिळेनाशी. म्हणून पडक्या संडास व स्नानगृहात दोघेही आश्रयास. जेवणाची सोय नाही. पुढे काय, याची जाणीव नाही. येणारे जाणारे गावकरी व्यथित. पण मदत कशी करणार हा प्रश्न.

ही बाब ‘लोकसत्ता ऑनलाईन’ माध्यमातून जगापुढे आली. तेव्हा तहसीलदार शिंदे यांनी माहिती देत सांगितले की, या मायलेकास रात्री ग्रामपंचायत कार्यालयात हलवण्यात आले. जेवणाची सोय करण्यात आली. ‘लोकसत्ता’ने घराचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा अपवाद म्हणून या कुटुंबास काही नियम शिथिल करीत घरकुल देण्याचा प्रस्ताव आता तयार केल्या जाईल. वरिष्ठ पातळीवर मान्यता घेऊ. त्यांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होईल. आरोग्य तपासणी पण केली. ते खुश आहेत, असे तहसीलदार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नमूद केले. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यांस दुजोरा दिला.

प्राप्त माहितीनुसार, या कुटुंबास पुढील मदत मिळेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयातच ठेवल्या जाणार आहे. तशी दक्षता घेण्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचित करण्यात आले आहे. मतिमंद असल्याने ते काही बाबी समजून घेत नाही. त्यांचे आधारकार्ड नाही. पण यातून मार्ग काढण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. आमदार समीर कुणावार यांनी पण काही वेळा या कुटुंबास मदत दिली. आता पुढे हे मायलेक वाऱ्यावर येवू नये म्हणून प्रशासन त्यांना दत्तक घेईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घर पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यांना सतर्क करण्यात आले होते. पण ते कुणाचेच ऐकत नाही. त्यांचे कोणी नातलग नाही. अशास्थितीत त्यांचा सांभाळ कसा करणार, ही गावकऱ्यांची चिंता. पण आता वृत्त उमटले आणि लगबग सूरू झाली. सध्या तरी शासकीय वास्तू हाच त्यांचा आधार ठरणार. तहसीलदार शिंदे म्हणतात, आम्ही आहोच. ते कुटुंब आता आमची जबाबदारी.