बडनेराचे आमदार रवी राणा यांना मोबाईलवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी आमदार रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा- नागपूर विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर महिलेचा अंगावर राॅकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

विनोद गुहे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रवी राणा यांच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून फोन येत आहेत. यामध्ये अज्ञात आरोपीने उद्धव ठाकरेंबद्दल एकही शब्द उच्चारल्यास रवी राणा यांना पिस्तूल आणि चाकूने ठार मारण्याची धमकी दिली आहे. सध्या रवी राणा हे नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनदरम्यान कामकाजात व्यस्त आहेत. गेल्या १८ आणि १९ डिसेंबर रोजी रवी राणा हे अमरावती येथे होते, त्यावेळी देखील अज्ञात व्यक्तीने धमक्या दिल्या आहेत. आमदार रवी राणा यांनी या धमकी देणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून अटक करण्याची मागणी गुहे यांनी केली आहे.

हेही वाचा- ‘झूठा प्यार था तेरा’ असे स्टेट्स ठेऊन पुढच्याच क्षणी….; आता पोलीस शोधताहेत चिठ्ठीतील संदर्भांचा अन्वयार्थ

गुहे यांच्या म्हणण्यानुसार, आधी आमदार राणा यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही, परंतु बऱ्याच वेळा या क्रमांकावरून फोन आल्यावर दक्षतेचा उपाय म्हणून ते ही तक्रार देत आहेत. भविष्यासाठी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे. रवी राणा यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. आरोपी स्वत:ला उद्धव ठाकरेंचा समर्थक सांगत आहे. पत्रकारांसमोर उद्धव ठाकरेंविरोधात काही बोलल्यास ठार मारण्यात येईल, असे आरोपीने फोनवरून सांगितले आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.