लोकसत्ता टीम

वर्धा: काही वर्षांपूर्वी एका प्राध्यापक युवतीस भरचौकात पेटवून देण्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. आता परत त्याच हिंगणघाटच्या भरचौकात या घटनेची पुनरावृत्ती होणार, तेवढ्यात आरोपीने पळ काढला.

येथील अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस आरोपी राज हा त्रास द्यायचा. तो उड्डाणपूल चौकात तिची वाट अडवून प्रेमाची मागणी घालत असे. मुलीचा मात्र सतत नकार. त्याचे असभ्य वर्तन वाढत गेले. अखेर तिने तिच्या व त्याच्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला. आरोपीस समजावून सांगण्यात आले. पण त्याचे एकतर्फी प्रेम संपलेच नाही. घटनेच्या दिवशी पीडिता घरी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी तिच्या घरी गेला. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू पण माझ्यावर कर. नाही केल्यास मी तुला जाळून मारून टाकील, असे आरोपीने दरडावले. मुलीने ओरड केली. भीतीने त्याने पळ काढला. हा विकृत प्रकार एकदाचा संपला पाहिजे म्हणून तिने हिंगणघाट पोलीसांकडे तक्रार केली. आरोपीस लगेच अटक करू, अशी खात्री पोलीस देत आहेत.