चंद्रपूर : शस्त्राचा धाक दाखवून तीन कोटींच्या खंडणीकरिता येथील क्रिकेट बुकी प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे अपहरण करणाऱ्या मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज (३६, रा. बिनबा गेट, चंद्रपूर) शेख नूर शेख इस्माईल ऊर्फ रशीद (३८, रा. नागपूर) व अजय पुनमलाल गौर (३५, रा. नागपूर) या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

महाकाली परिसरातील प्रदीप गंगमवार हा मोठा क्रिकेट बुकी आहे. १५ ऑगस्ट रोजी गंगमवार व त्याचा मित्र झाडे जुगार खेळण्यासाठी जात असताना मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज या त्यांच्याच एका मित्राने आपल्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने शस्त्राचा धाक दाखवत त्यांचे अपहरण केले. दोघांनाही नागपुरात नेण्यात आले. तेथून दोघांनीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. चंद्रपूर येथे येताच दोघांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तीन पथके गठित करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. तिन्ही आरोपी घुग्घुस येथील एका लॉजमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, आरोपी रात्रीच तिथून पांढऱ्या रंगाच्या कारने गडचांदूर येथे निघून गेल्याची माहिती मिळाली. गडचांदूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी कार अडवून तिघांनाही ताब्यात घेतले. यानंतर आरोपींना दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.