अकोला : मोटार बिघडल्याने महामार्गावर उभे असलेल्या चार जणांना अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे ऐन दिवाळीच्या दिवशी परिसरात शोककळा पसरली आहे.
दिवाळीच्या रात्री अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर काटेपूर्णा ते पैलपाडा गावादरम्यान एका अज्ञात वाहनाने मोटारीच्या बाजूला उभ्या असलेल्या चार जणांना चिरडले. या अपघातात पती-पत्नीसह तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून असून, एक जण गंभीर जखमी आहे.
बोरगाव मंजू येथील धीरज शिरसाट आणि अश्विनी शिरसाट हे दाम्पत्य खेर्डी येथील आपला व्यवसाय आटोपून एका प्रवासी मोटारीने बोरगाव मंजू गावाकडे घरी निघाले होते. मात्र, रस्त्यात त्यांची मोटार बिघडल्यामुळे एका मालवाहू वाहनाद्वारे वाहन नेण्यात येत होते. यावेळी हे चौघेही मोटारीच्या खाली उतरलेले होते. अमरावतीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने खाली उतरलेल्या या चारही जणांना जबरदस्त धडक दिली. या भीषण अपघातात दोन पुरुष आणि एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये धीरज शिरसाट, अश्विनी शिरसाट आणि आरिफ खान (चालक) यांचा समावेश आहे. हे तिघेही बोरगाव मंजू येथील रहिवासी होते. एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुमारे दोन तासांपर्यंत वाहतूक एकाच बाजूने वळविण्यात आली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. रात्रीच्या सुमारास बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून मदत कार्य राबवले.
थरारक घटनेमुळे खळबळ ‘हिट ॲन्ड रन’च्या या थरारक घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भीषण अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. आता अपघात करणाऱ्या त्या अज्ञात वाहनांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
